Sun, May 26, 2019 01:41होमपेज › Solapur › बार्शीत किसान सभेचे जेलभरो आंदोलन

बार्शीत किसान सभेचे जेलभरो आंदोलन

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 11:11PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

अखिल भारतीय किसान सभा बार्शी तालुका कौन्सिलच्या वतीने शेतकर्‍यांच्या  विविध मागण्यांसाठी बार्शी शहरात मोर्चा काढून मुख्य पोस्ट चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.  राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभर होत असलेल्या जेलभरोचा एक भाग म्हणून हे आंदोलन  कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी ‘दम है कितना तेरे शासन मे-देख लिया है देखेंगे, जगा है कितनी तेरे जेल मे-देख लिया है देखेंगे, भाजप फडणवीस-मोदी सरकार होश मे आवो’, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

तहसील कार्यालयास देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्‍ती करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या, स्वस्त दरात शेती औजारे उपलब्ध करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची तात्काळ अंमलबजावण्ी करा, कसत असलेल्या सर्वप्रकारच्या जमिनी नावे करा, सर्व कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर किमान 5000 रुपये पेन्शन द्या, शेतकर्‍यांना पीक, पशू व कुटुंब आरोग्य विम्याचे सर्वंकश संरक्षण द्या, गायीच्या दुधाला 35 रुपये व म्हशीच्या दुधाला 50 रुपये भाव द्या, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत सर्व कुटुंबांना आरोग्य संरक्षण द्या, या योजनेत ज्या कुटुंबाची नोंदणी नाही त्यांची नोंदणी तात्काळ करा, शेतकार्‍यांकडील सर्व वीज बिले माफ करा, शेतीसाठी पूर्ण दाबाने मोफत वीजपुरवठा करा, नदी, ओढे, नाले, तलाव, बंधारे यांचे राष्ट्रीयीकरण करावे.

यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले  सरकार भांडवलदारांचे बटिक झाले आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतिहास लक्षात घेत शेतकरी या भांडवली सरकारला लोकशाहीच्या मार्गाने ठिकाणावर आणतील. स्वामिनाथन व कर्जमाफीच्या घोषणा नको तर प्रत्यक्ष दिलासा मिळणे आवश्यक आहे, धर्म व देवाच्या मागे लपलेल्या या सरकारचा खोटा बुरखा शेतकरी फाडून टाकण्यासाठीची पावले टाकली जात आहेत.

 ए.व्ही. कडगंजी, अव्वल कारकून यांनी जेलभरोचे आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व शासनास कळवत असल्याचे सांगितले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे शिवाजी घाडगे, धनाजी ताकभाते, तानाजी काकडे, दत्तात्रय जगदाळे, संतोश घुगे, लहू आगलावे, विलास जगदाळे, चंद्रकांत जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, भारत भोसले,  धनाजी पवार, शेषराव जगदाळे, भीवा भालेराव, रामेश्‍वर बोडके, अशोक कांदे, नंदकुमार डांगे, प्रवीण मस्तूद, शौकत शेख, आदींनी कष्ट घेतले.  जेलभरोत सहभागी होत प्रहारच्या संजीवनी बारंगुळे   यांनी  पाठिंबा दिला.