Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Solapur › दुचाकी विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू 

दुचाकी विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू 

Published On: Sep 09 2018 4:17PM | Last Updated: Sep 09 2018 4:17PMमोहोळ : वार्ताहर 

शेतातील देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुचाकी विहिरीत पडल्‍याले मृत्‍यू झाला तर मागे बसलेला १५ वर्षीय मुलगा विहिरीच्या कठड्यावर पडल्याने जखमी झाला. हरिदास बाबुराव पवार (वय ५५ रा. अंकोली ता. मोहोळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना ०९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता अंकोली गावच्या शिवारात घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी ०९ सप्टेंबर रोजी बैलपोळ्याचा सण होता. त्यामुळे अंकोली (ता. मोहोळ) येथील शेतकरी हरिदास बाबुराव पवार हे बहिणीचा मुलगा केशव समाधान व्यवहारे यांच्यासह शेतातील देवाला नैवद्य दाखविण्यासाठी दुचाकीवरून शेतात गेले होते. सकाळी ११. ४५ वाजता त्यांची दुचाकी (क्र.  एम.एच.१३ ए.जी.९४१२) त्यांच्या शेतातील विहिरीच्या जवळ आली. त्यावेळी दुचाकी घसरुन तोल गेल्याने पाठीमागे बसलेला केशव व्यवहारे हा विहिरीच्या कडेला पडला तर  हरिदास पवार हे दुचाकीसह विहिरीत पडले. यामध्ये पाण्यात बुडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी अरुण हरिदास पवार यांनी मोहोळ पोलिसांना माहिती दिली असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक महेश कोळी हे करीत आहेत. एैन सणाच्या दिवशी पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे अंकोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.