Sun, Jul 21, 2019 08:06होमपेज › Solapur › बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांवर व्यवस्थेचा आसूड

बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांवर व्यवस्थेचा आसूड

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 10:19PM

बुकमार्क करा

लातूर : शहाजी पवार

बोंडअळीच्या फटक्याचा मारा झेलणार्‍या शेतकर्‍यांवर आता व्यवस्थेनेही आसूड उगारला असून तक्रारी अर्जापोटी त्यांना प्रती अर्ज सुमारे 250 रुपये मोजावे लागत असल्याने ते पुरते हैराण झाले आहेत. पीक पेर्‍याची माहिती तलाठ्यांकडे असताना व जायमोक्यावर पंचनामा होणार असताना कागदपत्रांची अट कशासाठी? असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. 

लातूर जिल्ह्यात कपाशीचे अत्यल्प क्षेत्र आहे. परंतु जळकोट तालुका हा नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने तेथे हे पीक घेतले जाते. यावर्षी सुमारे सातशे हेक्टर्सवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. परंतु हे सारे पीक आता बोंडअळीने फस्त केले आहे. सरकारदरबारी याची दखल घेण्यात आली असली तरी कागदपत्र व त्यात भरावयाच्या अटीने शेतकरी हैराण झाले आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकार्‍यांकडे सादर करावयाचा असून अर्जासोबत नमुना नंबर आठ, सातबारा, पीक पेरा उतारा, बियाणे खरेदीची पावती, आधार कार्ड, बँक पासबुकाची झेरॉक्स आदी ढिगारा कागदपत्र द्यावयाची असून तीन पानी अर्ज भरुन द्यावयाचा आहे.

अर्जात भरावयाची माहिती अतिशय क्लिष्ठ आहे. शेतकर्‍यांना अर्ज भरता येत नसल्याने इतरांना 50 रुपये देऊन तो भरुन घ्यावा लागत आहे. शिवाय महसुली कागदपत्रासाठी  नियमाप्रमाणे त्याचे शुल्क द्यावे लागते. त्यात गावातून तालुक्याला येणे जाण्यासाठी येणारा खर्च धरता ही रक्कम दोनशे ते अडीचशे रुपये होत आहे.  दिवसाची शेतकर्‍याची मजुरी धरली तर आकडा  700 रुपयांपेक्षा अधिक जात आहे. अर्ज भरून घेतल्यानंतर रांगेत थांबून तो द्यावा लागत असल्याने शेतकर्‍यांची पुरती दमछाक होत आहे.