Thu, Aug 22, 2019 15:18होमपेज › Solapur › ‘दक्षिण’मधील शेतकरी स्थलांतराच्या मानसिकतेत

‘दक्षिण’मधील शेतकरी स्थलांतराच्या मानसिकतेत

Published On: May 16 2019 2:14AM | Last Updated: May 16 2019 2:14AM
दक्षिण सोलापूर : संजीव इंगळे

दक्षिण सोलापूर तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश होऊन सहा महिन्यांचा अवधी लोटला आहे. एकीकडे दुष्काळाने गंभीर स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली असली तरी दुसरीकडे मात्र तालुक्यात एकही चारा छावणी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी आता आपल्या जनावरांना घेऊन स्थलांतराच्या मानसिकतेत आहेत. तर तालुक्यातील नेतेमंडळी मात्र दुष्काळी उपाययोजनांवर कमी आणि निवडणुकीवरच जास्त चर्चा करताना दिसून येत आहेत.

त्यामुळे दुष्काळी उपाययोजना पावसाळ्यात करणार काय, असा सवाल दुष्काळग्रस्त शेतकरी प्रशासनाला विचारत आहेत.
जिल्ह्यात दुष्काळाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांशी तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. असे असताना दक्षिण सोलापूर तालुक्याला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे एकूण स्थितीवरून दिसते. 

एकही चारा छावणी नाही
सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाकडून विविध तालुक्यांत     आजतागायत 166 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी दक्षिण सोलापूर तालुक्यात एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. 
तालुक्यात 2012 च्या पशुगणनेनुसार लहान-मोठी अशी एकूण 59 हजार 930 इतकी जनावरे आहेत. 2012 ते 2019 याकालावधीत जनावरांची संख्या आणखी वाढली आहे. त्याची शासन दरबारी नोंद नाही. सद्य:स्थितीतील जनावरांना दिवसाकाठी 1 हजार 161 मेट्रिक टन इतक्या चार्‍याची आवश्यकता आहे. 22 एप्रिलअखेर कृषि विभागाच्या दिलेल्या अहवालानुसार हिरवा चारा 7 हजार 607 मेट्रिक टन आणि सुका चारा 19 हजार 423 मेट्रिक टन इतका उपलब्ध असून एकूण 27 हजार 30 मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध आहे. 

जनावरांच्या दिवसाला लागणार्‍या चार्‍याच्या तुलनेमध्ये हा चारा साधारणतः केवळ महिनाभर पुरेल इतकाच आहे. पावसाने जर वेळेवर हजेरी लावली तर जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न उद्भवणार नाही अन्यथा पशुपालकांना जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न भेडसावणार आहे

केवळ 13 गावांत टँकर
तालुक्यात एकूण 90 गावे आहेत. त्यांपैकी 13 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गावांलगत असलेल्या वाड्यावस्त्यांना पाणी समस्या भेडसावत असताना स्थानिक पातळीवरून टँकरची मागणी करणे अभिप्रेत असताना तसे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मोठ्या गावांतील राजकीय वजन असलेले नेते आपापल्या गावांत टँकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र, वाड्यावस्त्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.

आचारसंहितेत सरला दुष्काळ

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकामुळे निवडणूक आयोगाकडून लावण्यात आलेली आचारसंहिता ही अडचण प्रशासनाकडून सांगितली जात होती. निवडणूक आयोगाने दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करून पंधरा दिवस उलटले तरी अद्याप प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ना. सुभाष देशमुख यांनी तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. शेतकर्‍यांनी दुष्काळी उपाययोजना करण्याची आग्रही मागणी त्यांच्याकडे केली. अनेक गावांनी टँकरच्या खेपा वाढवून देण्याची विनंती केली. मात्र, तरीही कोणत्याच उपाययोजना केल्याचे दिसत नाही.

उपाययोजना कधी करणार?
पुढील 15 दिवसांनंतर रोहिणी नक्षत्राचे आगमन होत आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होईल. तरीही अद्याप तालुक्यातील प्रशासन झोपेचे सोंग घेताना दिसत आहे. छावण्यांचे प्रस्ताव जाचक अटींमध्ये अडकून बसल्यामुळे तालुक्यातील जनावरे चार्‍याच्या प्रतीक्षेत आहेत. 

सर्वच तलाव पडले कोरडे
तालुक्यामधील सर्वच पाझर तलाव, साठवण तलाव हे कोरडे पडले आहेत. या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. सध्या शासन ‘गाळमुक्‍त धरण, गाळयुक्‍त शिवार’ ही संकल्पना राबवित असून याची अंमलबजावणी मात्र तालुक्यात होताना दिसून येत नाही. सध्या तालुक्यातून जाणार्‍या सोलापूर-विजापूर, सोलापूर-अक्‍कलकोट, सोलापूर-हैदराबाद महामार्गांच्या रुंदीकरणाचे काम जोमात सुरू आहे.  या महामार्गांच्या रस्त्यांना लागणारा मुरूम या कोरड्या तलावातून घेऊन गेल्यास त्यानिमित्ताने या तलावातील  गाळ मोठ्या प्रमाणात निघेल. या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास तालुक्यातील तलावांची खोली वाढून साठवण क्षमता वाढण्यास मदत होईल.