Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Solapur › नकली विडीचा उद्योग सोलापुरात फोफावला

नकली विडीचा उद्योग सोलापुरात फोफावला

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 8:59PM सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

बनावट सोलापुरी चादर-टॉवेलमुळे सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला मोठा फटका बसत असतानाच दुसरीकडे विडी उद्योगालाही नकली विड्यांनी ग्रासले आहे. नकली विडी सोलापुरात मोठ्या प्रमाणात बनत असल्याने विडी उद्योजक हैराण झाले असून ई-वे बिलची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास नकली मालाच्या विक्रीच्या ‘रॅकेट’ला आळा बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

चादर-टॉवेलबरोबरच विडी उत्पादनासाठी सोलापूर देशभरात प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही उद्योगांना नकली उत्पादनांनी ग्रासले आहे. यामुळे याचा मोठा फटका उत्पादकांंना बसत आहे. अलीकडे ‘रॅकेट’च्या माध्यमातून नकली विडी करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापुरात अधिकृतपणे व्यवसाय करणारे एकूण 14 विडी उद्योजक असून त्यांच्या ब्रँडची चोरी करुन नकली विड्या  बाजारात विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे या विड्या सोलापुरातच बनत आहेत. न्यू पाच्छा पेठ, दत्तनगर,  जुना व नवीन विडी घरकुल, एमआयडीसी, शास्त्रीनगर, नई जिंदगी आदी भागांत नकली विड्या तयार होतात. नकली विड्या बनविणार्‍या काही ‘उद्योजकां’ना पकडण्यात सोलापुरातील मुनशी, संभाजी, गणेश नावाच्या ब्रँडने विडीचे उत्पादन करणार्‍या उत्पादकांना यश आले आहे. गतवर्षी याप्रकरणी एकावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कमी दर्जाच्या पान, तंबाखूपासून नकली विड्या तयार करण्यात येतात. या विड्या तयार करणार्‍या कामगारांना केवळ मजुरी दिली जाते. पी.एफ, ग्रॅच्युईटी, बोनस दिले जात नाही. ब्रँडच्या नकली लेबलच्या आधारे या मालाची विक्री केली जाते. कमी दर्जाचा कच्चा माल वापरून तसेच करचुकवेगिरी करून तयार केलेला हा नकली माल स्वस्तात बनतो. रॅकेट पद्धतीने स्वस्तात विकले जात असल्याने त्याचा फटका ‘ओरिजनल’ उत्पादकांना बसत आहे. सोलापुरात बनावट विडीचे अनेक मंडळी असून रात्रीच्या वेळी त्यांचा हा ‘उद्योग’ सुरू  असल्याची माहिती सोलापूर विडी उद्योग संघाच्या सूत्रांनी दिली. धूम्रपान कायदा तसेच विविध करांच्या बोजामुळे आधीच संकटात असलेल्या या उद्योगाला नकली मालाच्या उपद्रवालाही सामोरे जावे लागत असल्याचे संघाचे म्हणणे आहे. 

ई-वे बिलची उद्योजकांना प्रतीक्षा

केंद्र सरकारने ई-वे बिलला मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी फेब्रुवारीपासून होणार होती. मात्र काही त्रुटींमुळे याची अंमलबजावणी झाली नाही. लवकरच अंमलबजावणी होणार असल्याने उद्योजकांना त्याची प्रतीक्षा आहे. जर याचा अमंल प्रभावीपणे झाल्यास नकली विडीच्या उद्योगाला आपोआपच आळा बसेल, असे साबळे-वाघीरे विडी कंपनीचे सरव्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे यांनी सांगितले. 

दंड व तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

नकली विड्या तयार तसेच विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. ट्रेडमार्क, कॉपीराईट, आय.पी.एल. कायद्यांतर्गत विविध कलमांखाली दंड  तसेच किमान सहा महिने ते कमाल तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे, अशी माहितीही जगदाळे यांनी दिली.