होमपेज › Solapur › दोषी प्राध्यापकाला 10 हजार रु. दंड

दोषी प्राध्यापकाला 10 हजार रु. दंड

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 8:48PMसोलापूर : प्रतिनिधी

हिराचंद नेमचंद महाविद्यालयातील एका प्राध्यापकाच्या चुकीमुळे विद्यापीठाचा पूर्वपरीक्षेतील पेपर विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार घडला होता. त्यावर त्या प्राध्यापकाला विद्यापीठाने दहा हजार रुपये दंड आणि परीक्षा कामकाजातून निष्कासित केल्याचे परीक्षा नियंत्रक बी. पी.  पाटील यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.

हिराचंद नेमचंद महाविद्यालयात दीड महिन्यापूर्वी बीबीए व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा झाली. यामध्ये हिराचंद नेमचंद महाविद्यालयातील एका प्राध्यापकाकडून चौथ्या सत्रातील परीक्षेसाठी विद्यापीठाने पूर्वपरीक्षेत वापरलेली प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली. यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात जनसेवा विद्यार्थी संघटना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटना, भारतीय विद्यार्थी सेना आदी संघटनांनी सोलापूर विद्यापीठास दोषींवर कारवाई करावी आणि पुन्हा पेपर घेण्याचे निवेदन दिले  अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता.

यावर सोलापूर विद्यापीठाने चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये हे प्राध्यापक दोषी आढळले असून त्या प्राध्यापकास दहा हजार रुपये दंड आणि परीक्षेच्या कामकाजातून निष्कासित केले आहे. या कारवाईमुळे विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. तसेच या कारवाईमुळे भविष्यात अशा प्रकाराला आळा बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.