Fri, Mar 22, 2019 01:59
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सर्वांसाठी घर, बांधकाम कामगारांना घर का नाही?

सर्वांसाठी घर, बांधकाम कामगारांना घर का नाही?

Published On: Mar 01 2018 12:55AM | Last Updated: Mar 01 2018 12:55AMसोलापूर : प्रतिनिधी

जगातील ऐतिहासिक अशा वास्तू बांधकाम कामगारांशिवाय शक्य झाल्या नाहीत. ताजमहाल, कुतुबमिनार, चारमिनार, दक्षिण भारतातील अनेक ऐतिहासिक मंदिरे ही बांधकामे कामगारांशिवाय पूर्ण होऊ शकली नाहीत. बांधकाम कामगार हा जगनिर्माता आहे; परंतु त्यालाच आज निवारा नाही. सरकार ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेची घोषणा करते; पण मग त्यात बांधकाम कामगारांना का नाही, असा सवाल माजी आमदार नरसय्या आडम यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, वाळू बंदीमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी येत्या 14 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

रंगभवन येथे आयोजित बांधकाम कामगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून आडम बोलत होते. अ‍ॅड. एम. एच. शेख व्यासपीठावर उपस्थित होते. शहर व जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे अनेक मजूर या मेळाव्यास उपस्थित होते.    

 बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या महिलादेखील लक्षणीय संख्येने उपस्थित होत्या. माजी आ. आडम यांनी सरकारवर बोचरी टीका करत संबोधित केले की, जगनिर्मात्याला स्वत:चे घर नसणे  हे या देशाचे दुर्दैव आहे. देशभरातील विधानसभांमध्ये निवडून  येणार्‍या आमदारांना सरकारतर्फे पेन्शन देण्यात येते. परंतु ज्या जनतेने किंवा ज्या कामगारांनी या आमदारांना निवडून दिले अशा असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांना मात्र  पेन्शन नाही.

अ‍ॅड. एम.एच. शेख म्हणाले की, स्मार्ट सिटी हे बांधकाम कामगारांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. अनेकजणांची कामगार आयुक्‍तांकडे नोंदणीदेखील झाली नाही. या क्षेत्रातील काम करणार्‍या प्रत्येकाची कामगार आयुक्‍तांकडे नोंदणी झालीच पाहिजे. विशेषत: महिला या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करतात. बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या मजुरांना शासनातर्फे  आरोग्य उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. सरकारी बांधकाम क्षेत्रात अनेक महिला व पुरुष काम करताना आढळतात. त्यांचीदेखील नोंदणी झालेली नसते.

व्यासपीठावर रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, श्रीकांत कांबळे, सिद्राम म्हेत्रे, इलियास सिध्दीकी, शकील शेख, सिटू संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रस्तावना रंगप्पा मरेड्डी यांनी केली. सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केले.