Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Solapur › फरार दरोडेखोरांना लवकरच पकडणार : नांगरे-पाटील

फरार दरोडेखोरांना लवकरच पकडणार : नांगरे-पाटील

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 9:35PMमोहोळ : प्रतिनिधी

उर्वरित दरोडेखोरांना पकडून लवकरच गजाआड करणार आहोत. गृह राज्यमंत्री यांच्या माध्यमातून अबू कुरेशी यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यासाठी व शौर्य पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे. अबू कुरेशी हे मोहोळवासीयांसाठी आदर्श आहेत, असे गौरवोद‍्गार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी पोलिस पथकावर हल्ला केल्यानंतर पोलिसांच्या मदतीला गेलेले अबू कुरेशी हे दरोडेखोरांशी लढताना गंभीर जखमी होऊन मृत झाले. या पार्श्‍वभूमीवर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे बुधवारी मोहोळ येथे आले होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक  एस. वीरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह डोंगरे आदी अधिकारी उपस्थित होते. 

मंगळवारी रात्री झटापटीत वैजीनाथ रामा भोसले (रा. जामगाव, ता. मोहोळ) यास जेरबंद करण्यात यश आले असून उर्वरित दरोडेखोर फरार आहेत. दरोडेखोरांनी पोलिस कर्मचारी सचिन मागाडे, सचिन गायकवाड, रामनाथ बोंबीलवार, समीर खैरे यांच्यावर चाकूने सपासप वार केले. जखमींवर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. मोहोळचे पोलिस सचिन गलांडे, विजय जाधव हे दोन पोलिस कर्मचारीही किरकोळ जखमी झाले आहेत.

यावेळी नांगरे-पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यांची एक गोपनीय बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर दरोडेखोरांनी ज्याठिकाणी गुन्हे शाखेच्या पोलिस पथकावर हल्ला केला,  त्याठिकाणाला भेट दिली. स्वतःचा प्राण देऊन दरोडेखोराला पकडून देणार्‍या अबू कुरेशी यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनि निलेश बडाख, सपोनि विक्रांत बोधे, सपोनि दत्तात्रय निकम, पो. उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव आदींसह मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की, अबू कुरेशी हे आपल्या सर्वांसाठी दि रियल हिरो होते. त्यांनी पोलिसांचा जीव वाचविण्यासाठी केलेले धाडस अतुलनीय आहे. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. यापुढे अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याच्या कारवाया करताना सशस्त्र करण्याच्या सूचना सर्व अधिकार्‍यांना दिल्या आहेत. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यांसारखे गुन्हे घडतील. त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा खणखणीत इशारादेखील यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

तत्पूर्वी दुपारी 12 वाजता मृत अबू कुरेशी यांचे पार्थिव शरीर मोहोळ येथे आणण्यात आले. यावेळी कुरेशी जमातच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेबाबत पोलिस प्रशासनाला धारेवर धरत सोलापूर येथील पोलिसांनी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिल्याबद्दल नांगरे-पाटील यांच्यासमोर संताप व्यक्‍त केला.

यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी अबू कुरेशी यांचे बलिदान वाया जाणार नाही. शासनस्तरावरुन योग्य कारवाई पोलिस प्रशासन करत असल्याचे सांगून जमावाला शांततेचे आवाहन केले. त्यानंतर शासकीय इतमामात अबू कुरेशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी कर्मचारी व मोहोळवासीय उपस्थित होते.