Wed, Feb 20, 2019 03:09होमपेज › Solapur › वीज मोफत नसेल तर किफायतशीर तरी द्या

वीज मोफत नसेल तर किफायतशीर तरी द्या

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 11:02PMलातूर : प्रतिनिधी

शेजारचे तेलंगणा शेतकर्‍याला मोफत वीज पुरवत आहे. तुम्हाला मोफत देता येत नसेल तर किमान किफायतशीर दरात तरी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लातूर येथे  पत्रकार परिषदेत केली.

हल्लाबोल मोर्चासाठी पवार लातूर दोर्‍यावर आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यात सरकार चौफेर अपयशी ठरल्याचा आरोप करीत त्यांनी सरकारवर टिकेची झोड उठवली. करू, पाहू, देऊ असाच पाढा ते वाचत आहे. शेतीला वीज नाही, कामगारांना काम नाही, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही. सर्वजण भरडले जात आहेत. राज्यातील 1400 शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्तानींच सांगितले आहे.

शेतीला किमान आठ ते दहा तास माफक दरात अखंडित वीजपुरवठा केला पाहिजे. त्यासाठी पर्यावरणा अनुकूल सौरऊर्जेचा  पर्याय पुढे ठेवत सरकारने ही ऊर्जा शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.  भीमा-कोरेगावचा मास्टर माईंड कोण? याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. हल्लाबोलला जनतेचा भक्‍कम पाठिंबा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदे्स विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते. 

एकीकडे बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्यातील वादाला आपण बळ देत आहात व त्याचवेळी स्वत:च्या काकांचा मात्र मानमरातब ठेवत आहात, असा सवाल केला असता अजितदादा म्हणाले की, पुतण्याने काकांचा मान ठेवलाच पाहिजे. एखादे नेतृत्व त्याच्या चांगल्या गुणामुळे विकसित होत असेल तर तेही केलेच पाहिजे. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीतच आहेत. उगाच शंका घेऊ नका, असे सांगत त्यांनी विषय बदलला.महावितरणच्या चुकीच्या वीज बिलामुळे विष प्राषन केलेल्या औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शहाजी राठोड या शेतकर्‍यास राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एक लाख रुपयांची मदत  अजित पवार यांनी दिली. शुक्रवारी पवार यांनी रुग्णालयात जाऊन राठोड यांच्या प्रकृतीबाबत विचारपूसही केली.