Wed, Aug 21, 2019 15:14होमपेज › Solapur › 18 गैरहजर गुरुजी बडतर्फ

18 गैरहजर गुरुजी बडतर्फ

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:54PMसोलापूर ः प्रतिनिधी 

सातत्याने सुधारण्याची संधी दिल्यानंतरही शाळेत शिकविण्यासाठी न आलेल्या, अनेक दिवस गैरहजर असणे आदी कारणांनी 18 गुरुजींना बडतर्फ, तर ग्रामपंचायतींत मनमानी कारभार करून शासकीय निधीचा गैरप्रकार करणार्‍या तीन भाऊसाहेबांना सेवेतून निलंबित करण्याची धाडसी कारवाई जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी मंगळवारी केली. सोमवारी सायंकाळीच तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते. मंगळवारी पुन्हा मोठा दणका डॉ. भारूड यांनी दिल्याने बेफिकीर व गैरप्रकार करणार्‍या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. 

सांगोला तालुक्यातील कारंडेवाडी येथील शिक्षक डी.एस. मिसाळ हे मार्च 2017 पासून गैरहजर होते. त्यांच्या चार वेतनवाढी थांबविण्याची कारवाई करण्यात आली होती. तरीही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी येथील शिक्षक जे. एस. भोसले हे 2015 पासून गैरहजर होते. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील शिक्षक एम. एस. कोळी 2016 पासून गैरहजर असल्याने त्यांची एक वेतनवाढ रोखून बडतर्फ करण्यात आले आहे. 

माळशिरस तालुक्यातील गारवाड शाळेतील शिक्षक राजू पवार हे 2016 पासून गैरहजर असल्याने दोन वेतनवाढी रोखून त्यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. याच तालुक्यातील मिरे शाळेतील शिक्षक बी. एम. साबळे हे 2016 पासून गैरहजर असल्याने त्यांच्या चार वेतनवाढी रोखून बडतर्फ करण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील नारी शाळेतील शिक्षक एस. एन. बगाडे हे 2016 पासून गैरहजर असल्याने त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्यात आल्या होत्या. तरीही त्यांची सुधारणा न झाल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील कुंभारगाव शाळेतील व्ही. एल. भोसले हे 2016 पासून गैरहजर असल्याने चार वेतनवाढी रोखण्यात आल्या होत्या. त्यांना आता बडतर्फ करण्यात आले आहे. माढा तालुक्यातील भुईंजे शाळेतील शिक्षक ए. एम. शिंगे हे 2016 पासून गैरहजर होेते. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले.

अक्‍कलकोट तालुक्यातील कडबगाव शाळेतील शिक्षक पी. एन. पवार हे 2017 पासून गैरहजर असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील पोमलवाडी शाळेतील शिक्षक एस.ए. निंबाळकर हे 2016 पासून गैरहजर असल्याने त्यांची एक वेतनवाढ बंद करुन बडतर्फ करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील अरबळी शाळेतील शिक्षक मनिषा चौधरी हे 2015 पासून गैरहजर असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील खेडभाळवणी शाळेतील बी.एस.धांडोरे हे 2017 पासून गैरहजर असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले. माळशिरस तालुक्यातील माने वस्ती शाळेतील शिक्षक पी.ए.साबळे हे 2016 पासून गैरहजर असल्याने तीन वेतनवाढी रोखून बडतर्फ करण्यात आले आहे. 

अक्‍कलकोट तालुक्यातल सिन्‍नूर शाळेतील शिक्षक आर.व्ही. सुतार हे 2016 पासून गैरहजर होते. पंढरपूर तालुक्यातील गार्डी वस्ती येथील शिक्षक संपत आसबे हे 2015 पासून गैरहजर होते. माढा तालुक्यातील टाकळी येथील शिक्षक एम.एम.निंबाळकर हे 2012 पासून, अक्‍कलकोट तालुक्यातील मैेंदर्गी शाळेतील शिक्षक एन.एस. कोळी हे 2016 पासून, तर माळशिरस तालुक्यातील मिरे शाळेतील शिक्षक एम.एम. राऊत हे 2016 पासून गैरहजर असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. 

एकाच गावात काम केलेले तीन ग्रामसेवक निलंबित 

पंढरपूर पंचायत समिती अंतर्गत टाकळी  ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ए.एम. मोरे हे 14 व्या वित्त आयोगातील निधी विहीत योजनेसाठी न वापरता अन्य कारणासाठी वापर केला, दप्‍तर अपूर्ण ठेवणे व शासकीय निधीचा गैरउपयोग करणे आदी कारणांमुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच ग्रामपंचायतीत यु.डी. भोसले, एस.एम. येलपले यांनीही ग्रामसेवक म्हणून काम करत असताना वरीलप्रमाणेच कारभार केल्याने या तिघांना निलंबित करण्याची कारवाई डॉ. राजेंद्र भारुड यांनी केली आहे.