Wed, Jul 24, 2019 12:16होमपेज › Solapur › विज्ञाननिष्ठेशिवाय देशाला भवितव्य नाही : डॉ. आ. ह. साळुंखे 

विज्ञाननिष्ठेशिवाय देशाला भवितव्य नाही : डॉ. आ. ह. साळुंखे 

Published On: Aug 19 2018 1:34AM | Last Updated: Aug 18 2018 8:42PMसोलापूर ः प्रतिनिधी

परंपरागत अनिष्ठ रुढी, कर्मठपणामुळे आजपर्यंत समाजाची अतोनात अधोगती झाली आहे. विज्ञानवादाच्या युगात या अनिष्ठ रुढी, परंपरांना नष्ट करून विज्ञाननिष्ठा जोपासल्याशिवाय देशाला भवितव्य नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

डॉ. आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सव गौरव समितीतर्फे शनिवारी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात डॉ. साळुंखे यांचा सत्कार ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ज. वि. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समिक्षक डॉ. गो. मा. पवार, डॉ. अजिज नदाफ, माजी आ. निर्मलाताई ठोकळ उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. साळुंखे म्हणाले की, देशाचे ऐक्य टिकवण्यासाठी माणसे तोडण्याऐवजी जोडण्याची नितांत गरज आहे. सध्याचे कलुषित वातावरण पाहता हे घडणे अत्यंत गरजेचे आहे. मतभेदांपलीकडे जाऊन दुसर्‍याचे स्वातंत्र्य टिकवून त्याला मुक्त स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याईतपत सौहार्द निर्माण होणे गरजेचे आहे. चिकित्सा, प्रयोग यांचे अधिकार शाबूत ठेवून समाजाच्या जडणघडणीला पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

यावेळी बोलताना ज. वि. पवार म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये चांगल्या व्यक्तींना, विचारांना पारखण्याची क्षमता नाही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी त्यांच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमांत समावेश करण्याची गरज आहे. असे घडल्यास शालेय विद्यार्थ्यांची विज्ञानवादी मानसिक जडणघडण होईल.

डॉ. गो. मा. पवार म्हणाले की, समाजात रुढीवादी, कर्मठ विचारांचा एक प्रवाह आणि पुरोगामी, चिकित्सक विचारांचा दुसरा प्रवाह, असे दोन प्रवाह आहेत. पुरोगामी व चिकित्सक प्रवाहाचे नेतृत्व डॉ. आ. ह. साळुंखे हे अव्याहतपणे करीत आले आहेत. त्यांच्या या योगदानामुळे पुरोगामी विचारांची एक पिढी घडली आहे. त्यांच्या हातून असेच दर्जेदार साहित्य लेखन उत्तरोत्तर घडो. प्रास्ताविक राम गायकवाड यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले. प्रारंभी डॉ. साळुंखे यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला.