Sun, Apr 21, 2019 06:37होमपेज › Solapur › शिक्षणाला महत्त्व द्या : मौलाना बेग

शिक्षणाला महत्त्व द्या : मौलाना बेग

Published On: Jun 16 2018 10:49PM | Last Updated: Jun 16 2018 10:01PMसोलापूर : प्रतिनिधी

शिक्षणाच्या कमतरतेमुळे मुस्लिम समाजाचा विकास झालेला नाही. त्यामुळे आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाकडे वळवा. त्यांचे शिक्षण अर्धवट करू  नका, असा संदेश रमजाननिमित्त रंगभवन येथे मौलाना ताहेर बेग यांनी समाजबांधवांना दिला.

मुलींच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य द्या. मुलींनी कोणत्याही सबबीवर अर्धवट शिक्षण सोडू देऊ नये. मुलींनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे. मोठमोठ्या पदावर विराजमान व्हावे.  नोकरी प्राप्त करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
त्यांनी शिक्षणासाठी इस्त्राईलमध्ये ज्यू ची संख्या कमी असूनही शैक्षणिक विकासामुळे हुकूमत गाजवत असल्याचे उदाहरण दिले. ज्यू लोक शिक्षणाच्या जोरावर अनेक संशोधनाचे पुरस्कार जिंकतात. जपान देशाने दुसर्‍या महायुध्दात हिरोशिमा व नागासकी या शहरांची उद्ध्वस्त पाहिलेली प्रतिमा आणि काही दिवसानंतर ते शहर जगाच्या खूप पुढे गेल्याचे सांगितले, जे शिक्षणामुळे शक्य झाले आहे.

तर अरबी लोक ही यापूर्वी अडाणी होते. त्यांनी शैक्षणिक विकास केला. तसेच त्यांनी जगाच्या पाठीवर अरबी व्यवस्था निर्माण केली. पेट्रोलच्या माध्यमातून आज ते जागतिक अर्थव्यवस्थेला मुठीत धरून आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे. शैक्षणिक विकास झाल्यास प्रत्येक बाबतीत विकास होतो, असा संदेश यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी समाजबांधवांना दिला.

मुस्लिम समाजातील पवित्र सण अशी ख्याती असणार्‍या रमजान सणाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तम नियोजन करुन यंदाच्या वर्षीही पोलिस आयुक्तालयाच्यावतीने जातीय सलोखा उपक्रम राबविला. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिमबांधवांना पोलिस आयुक्तालयाच्यावतीने पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, रुपाली दरेकरयांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा उपक्रम शहर पोलिसांच्यावतीने होटगी रस्त्यावरील आलमगीर इदगाह मैदान, रंगभवन येथील अहलेहदीस इदगाह मैदान, जुनी मिल कंपाऊंडमधील इदगाह मैदान याठिकाणी होणार्‍या नमाज पठणानंतर राबवण्यात आला.  या जातीय सलोखा उपक्रमांमुळे मुस्लिम समाजबांधवांच्या चेहर्‍यांवर  समाधान आणि सुरक्षेची भावना जाणवत होती.  

ईदनिमित्ताने शहरातील प्रत्येक ईदगाह आणि मशिदीच्या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नमाज पठणाच्यावेळी वाहतुकीचा अडथळा  होऊ नये म्हणून प्रमुख 38 ठिकाणच्या रस्त्यांवर बॅरिकेटस् लावण्यात आल्या होत्या. त्या त्याठिकाणाची वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीची रहदारी दिसून आली नाही. 

नमाज पठणावेळी आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकारी हे स्वतः ईदगाह मैदानावर हजर होते. रमजान ईदसाठी शहरात पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली  तीन   पोलिस  उपायुक्त, पाच  सहायक पोलिस आयुक्त, 21 पोलिस निरीक्षक, 58 सहायक निरीक्षक,  पोलिस शिपाई 803, होमगार्ड 200,  100 प्रशिक्षणार्थी, एक राज्य राखीव दल, वज्र, वरुण वाहन, बॉम्बशोधक व नाशक पथक, कमांडो पथक, शीघ्र कृती दल यांचा समावेश आहे तसेच वाहतूक  पोलिसांचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये  एक साहाय्यक पोलिस आयुक्त, दोन पोलिस निरीक्षक, पाच फौजदार आणि 100 पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.