Mon, Jul 22, 2019 03:17होमपेज › Solapur › जलयुक्त शिवार अभियानामुळे माळशिरस तालुका टँकरमुक्त

जलयुक्त शिवार अभियानामुळे माळशिरस तालुका टँकरमुक्त

Published On: May 02 2018 10:49PM | Last Updated: May 02 2018 10:07PMमाळशिरस : अनंद दोशी

 माळशिरस तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे एप्रिल महिना संपला तरी टँकरची मागणी कोणत्याही गावाने केली नाही. एकमात्र जळभावी गावाने टँकरची मागणी केली आहे. त्याच गावातीला लोकांनी शेतीसाठी पाणी उपसल्याने त्यांच्यावर ती वेळ आली आहे. हा अपवाद वगळता तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची परस्थिती चांगली दिसून येत आहे.
तत्कालीन जिल्हा अधिकारी तुकाराम मुंडे यांनी जलयुक्त शिवार अभियान ही संकल्पना मांडली. त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन शेतकर्‍यांसह अधिकार्‍यांना या अभियानाची माहिती स्वतः पटवून दिली. यामध्ये पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविले पाहिजे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, राज्यांच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्‍वता निर्माण करणे, विकेंद्रीत पाणी साठा निर्माण करणे, अस्तीत्वात असलेले व निकामी बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव सिमेंट बंधारे आदी जलस्त्रोतांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतातील गाळ लोक सहभागातून काढून पाणी साठा वाढविणे हा जलयुक्त अभियानाचा उद्देश सर्वांना पटवून दिला. 

 जिल्ह्यात पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण व रुंदीकरण, जुन्या संरचनाचे पुर्नजीवन, कोल्हापूर पद्धतीच्या व साठवण बंधार्‍याची दुरुस्ती, पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरुस्ती, पाझर तलाव शिव कालीन तलाव यासह सर्व नाला बांधातील गाळ काढणे ही कामे केली. त्यानंतर झालेल्या पावसामध्ये कामे केलेल्या सर्व ठिकाणी पाणी अडविले गेले. त्यामुळे त्या -त्या ठिकाणी भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली गेली. ही जलसंधारणाची कामे होण्यापूर्वी जानेवारीपासूनच टँकर मागणी अनेक गावातून होत होती. रेडे, गारवाड सारख्या गावामध्ये सतत दोन वर्ष टँकर सुरू ठेवावा लागत होता. परंतु आज ही गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी हे अभियान राबविण्यासाठी अठरा गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी काळेगाव, काळमवाडी, मोटेवाडी, फोंडशिरस, कन्हेर तसेच सन शिंगोर्णी या गावाची कामे पूर्ण झाली आहेत. या अभियानाचे महत्त्व सर्वांनाच पटल्यामुळे अनेक ठिकाणी लोक सहभागातून कामे करण्यात आली. तसेच तालुक्यातील साखर कारखान्यासह खाजगी संस्थानी पुढाकार घेऊन अनेक कामे केली. त्यामुळे आज तालुक्याच्या भुगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे त्याचबरोबर तालुका टँकर मुक्त झाला आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांचा हा पॅटर्न राज्यांसाठी रोल मॉडेल ठरला असून शासनाच्या तिरोजीवरचा टँकरसाठीचा कोट्यवधीचा बोजा कमी झाला आहे.