Tue, Apr 23, 2019 07:44होमपेज › Solapur › रुग्णवाहिकेतून बाजार, औषधांची वाहतूक

रुग्णवाहिकेतून बाजार, औषधांची वाहतूक

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 9:02PM

बुकमार्क करा
सोलापूर : रणजित वाघमारे

मेडिकल कॉलेज सांभाळणार्‍या अधिष्ठातांच्या आदेशावरून रूग्णवाहिकेतून रद्दी वाहतुकीचा प्रकार घडला. तर 108 ही रूग्णवाहिका मॉलमध्ये बाजारासाठी, औषधे, घरगुती बॉक्स व साहित्याची वाहतूक करण्यासाठी वापरली तर नवल ते कसले. तसेच सिव्हिलमध्ये स्ट्रेचर आणि व्हिलचेअरवरून रूग्णांऐवजी ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक केली जाते. परंतु सोलापूर जिल्ह्यात या गोष्टी सर्रास घडत असताना त्याकडेे राज्य आरोग्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचे दुर्लक्ष आहे की या गैरप्रकाराला पाठबळ, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी रद्दी वाहतुकीसाठी अद्ययावत अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर केल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतरही जिल्ह्यातील अ‍ॅम्ब्युलन्सचा गैरवापर थांबला नाही. त्यानंतर नुकतेच आपत्कालील सेवेसाठी  वापरली जाणारी 108 ही अद्ययावत रूग्णवाहिका बाजार खरेदीसाठी एका मॉलमध्ये दिसून आली आणि यासाठीचे कापले गेलेले अंतर एखाद्या रूग्णाच्या माथी मारून आपसूकच पैसे उकळले जात आहेत. या गैरप्रकाराबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंदुरकर-कांबळे यांना विचारले असता त्यांनी 108 चे जिल्हा समन्वयक अनिल काळे यांना नोटीस देऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे डापको व टीबी विभागातही औषधे, साहित्य वाहतुकीसाठी अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर केला जात आहेे. 

टीबीच्या प्र. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बनसोडे यांना याबद्दल विचारले असता त्यांनी रूग्णवाहिकेतून औषधे ने-आण करता येत असल्याचे सांगितले. तर डापकोचे भगवान भुसारे यांनी  रूग्णवाहिकेतून औषधे पाठवली असल्याचे सांगितले. राज्यमंत्री यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.