Tue, Aug 20, 2019 04:36होमपेज › Solapur › ना पाऊस, ना पाणी, नुसतंच वारं

ना पाऊस, ना पाणी, नुसतंच वारं

Published On: Jul 30 2018 1:33AM | Last Updated: Jul 29 2018 10:46PMबेंबळे : सिद्धेश्‍वर शिंदे 

राज्यात अन्य जिल्ह्यात पावसाने हैदोस माजवला. पण सोलापूर जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली. यामुळे ना पाऊस, ना पाणी, नुसतं वाहतंय वारं, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

सुरुवातीला पावसाने थोडाफार दिलासा दिला, पण नंतर हा पाऊस गायबच झाला. उजनीच्या वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने उजनीत विसर्ग येत आहे. यामुळे उजनी प्लसमध्ये आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस गायब झाल्याने हिरवीगार असलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. उजनीत आजपर्यंत 32 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात दौंड येथून कमी अधिक प्रमाणात उजनीत आतापर्यंत सातत्याने येत आहेच. यामुळे उजनीची पाणीपातळी वाढत आहे. यंदा उजनी शंभर टक्के भरेल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. यामुळे उजनीवर भिस्त असलेल्या शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत असले तरी उर्वरित भागातील शेतकर्‍यांचे डोळे मात्र आकाशाला भिडले आहेत. आता उजनीची वाटचाल शंभरीकडे चालू आहे. 

त्या 19 धरणांपैकी 12 धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे त्या धरणात पडणारे पावसाचे पाणी थेट उजनीच्या दिशेने येणार हे नक्की. त्यामुळे उजनी धरणातून बोगदा व कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. विनापावसामुळे आधीच शेतकरी दयनीय अवस्थेत आहे.किमान उजनी धरणातून पाणी सोडून पिके वाचविण्याची मागणी होत आहे. धरण 100 टक्के भरल्यावर धरणातून भीमा नदीत पाणी सोडून दिले जाते. तेच पाण्याचे आतापासून नियोजन करुन शेतीला थोडे फार पाणी सोडले तर शेतातील पिके नक्कीच वाचतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.