Thu, Aug 22, 2019 12:38होमपेज › Solapur › नऊ तालुके टंचाईसदृश 

नऊ तालुके टंचाईसदृश 

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 08 2018 1:34AMसोलापूर : प्रतिनिधी

यंदा निम्मा पावसाळा संपला तरी सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 9 तालुक्यांत सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे काळे ढग जमा झाले असून, यावर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या असल्या तरी नंतरच्या काळात दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 11 पैकी नऊ तालुक्यांत सध्या टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐनवेळी उद्भवणार्‍या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे. यंदा उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांनी समाधान व्यक्त केले असले तरी शेतकर्‍यांचा जीव मात्र कासावीस होत आहे. अनेक तालुक्यांत सरासरीइतका पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक तालुक्यांतील विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. तर, अनेक लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. पावसाचे शेवटचे तीस ते पस्तीस दिवस उरले आहेत. त्यामुळे या कालावधीत सरासरी भरून निघेल इतका पाऊस पडणे अशक्य आहे. 

उजनी भरले; विहिरी, पाझर तलाव कोरडेच!
जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे भरले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील विहिरी आणि पाझर तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्प अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे दुष्काळाचे सावट कायम राहणार आहे.