Tue, Nov 19, 2019 12:53होमपेज › Solapur › दुष्काळ, ‘हुमणी’मुळे उसाचे क्षेत्र घटणार!

दुष्काळ, ‘हुमणी’मुळे उसाचे क्षेत्र घटणार!

Published On: Jun 26 2019 1:40AM | Last Updated: Jun 26 2019 1:40AM
सोलापूर : गणेश क्षीरसागर

गतवर्षी पावसाने दडी मारल्यानंतर यंदाही पावसाचा रुसवा कायम असल्याने याचा परिणाम जिल्ह्यातील ऊस लागवडीच्या क्षेत्रावर होणार आहे. त्यातच गतवर्षी जिल्ह्यातील 52 हजार 799 हेक्टरवरील उसाचे क्षेत्र हुमणी अळीने ग्रासले होते. जिल्ह्यात 1 लाख 61 हजार 776 हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. चालू वर्षी पाऊस  लांबल्याने उसाची नवीन लागवड अद्याप  झाली नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले. 

‘हुमणी’ने बाधित झालेल्या क्षेत्रातील ऊसही यंदा नसणार आहे. परिणामी जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची दाट शक्यता कृषी अधिकार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे.उजनी धरणाच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची संख्याही प्रचंड वाढली. वाढत्या ऊसाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारीही वाढली. सध्या जिल्ह्यात सहकारी आणि खासगी मिळून 35 साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे दुष्काळी सोलापूरची महाराष्ट्रात साखरपट्टा म्हणून ओळख झाली आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास ऊसाची लागवड करणेही अवघड होणार आहे. गतवर्षी जिल्ह्यातील 533 गावांतील तब्बल 95 हजार शेतकर्‍यांच्या 52 हजार 799 हेक्टरवरील ऊसाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. याचा परिणामही यंदाच्या ऊस लगवडीवर होणार आहे.

माळशिरस, पंढरपूर, करमाळा, मोहोळ आणि माढा या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. परंतु सध्या या चारही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला नाही. या चार तालुक्यांत गतवर्षी मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादूर्भाव झाला होता. पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 49 हजार 619 शेतकर्‍यांचा 32 हजार 147  हेक्टरवरील ऊस हुमणीने ग्रासला होता. त्याखालोखाल मोहोळ तालुक्यातील 18 हजार 168 शेतकर्‍यांच्या 6 हजार 809 हेक्टर, माळशिरसमधील 13 हजार 499 शेतकर्‍यांचा 7 हजार 647 हेक्टरील उसाला हुमणीने ग्रासले होते. याशिवाय सांगोला, माढा, मंगळवेढा, बार्शी व करमाळा या तालुक्यांतही हुमणीचा प्रादूर्भाव झाला होता. याचा परिणाम म्हणून यंदा ऊसाचे क्षेत्र कमी होऊन खरिपाच्या पेरण्यांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 

सरासरी 36 मि.मी. पावसाची नोंद

जून महिन्याच्या 25 दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण 406.9 मिलीमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरी 36 मिलीमीटर आहे. जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक 77.92 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली, तर करमाळा तालुक्यात सर्वात कमी 11.40 मि.मी. पाऊस झाला आहे. खरिपाची पेरणी करण्यासाठी हा पाऊस पुरेसा नसून आणखी पाऊस होण्याची गरज आहे.
खरिपाच्या पेरण्या वाढणार!

2018 मध्ये जिल्ह्यात ऊस वगळता 79 हजार 17 हेक्टरवर खरिपांच्या पिकांची पेरणी झाली होती. यामध्ये 64 हजार 773 हेक्टरवर अन्नधान्य व 27  हजार 721 हेक्टरवर तृणधान्याची पेरणी झाली होती. यंदा ऊसाच्या क्षेत्रात घट झाल्यास हे शेतकरी खरिपांच्या पिकांकडे वळणार आहेत. त्यामुळे यंदा खरिप पिकांच्या पेरणीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.