Mon, Apr 22, 2019 12:24होमपेज › Solapur › डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्‍ताहास प्रारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्‍ताहास प्रारंभ

Published On: Apr 08 2018 10:19PM | Last Updated: Apr 08 2018 9:29PMसोलापूर : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शासनाच्या आदेशानुसार 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी पार्क चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन या उपक्रमास सुरुवात  करण्यात आली. 

यावेळी समाजकल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, महापालिका आयुक्‍त अविनाश ढाकणे आदींसह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

9  एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने सर्व शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा, वसतिगृहात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्‍नमंजुषा, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. 10 एप्रिल रोजी सोलापुरातील सात रस्ता येथील सामाजिक न्याय भवनात जिल्हा आरोग्य अधिकारी व सिव्हिल सर्जन यांच्या सहकार्याने रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
11 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती देऊन जागृती करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 12 एप्रिल रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

13 एप्रिल रोजी जिल्ह्यातील नामवंत विचारवंत, पत्रकार व सामाजिक चळवळीतील व्यक्‍तींचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्‍ताह कार्यक्रमाचा सांगता समारोप होणार असल्याची माहिती विशेष समाजकल्याणचे सहायक आयुक्‍त अमित घवले यांनी दिली.