Sat, Apr 20, 2019 08:27होमपेज › Solapur › मनपाकडून दिला जातोय श्‍वानदंशाचा ‘ओव्हर’ डोस

मनपाकडून दिला जातोय श्‍वानदंशाचा ‘ओव्हर’ डोस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेकडून श्‍वानदंश झालेल्या व्यक्तींनी गरजेपेक्षा जास्त म्हणजे ‘ओव्हर’ डोस दिला जात असल्याची धक्कादायक बाब शिवसेनेचे नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांनी  उजेडात आणली आहे. याविषयी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना पत्र देऊन लक्ष वेधले आहे.

धुत्तरगावकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्‍वानदंश झालेल्या नागरिकांना सध्या महापालिकेच्या वतीने जी लस (ए.आर.व्ही.) दिली जाते ती इंट्रॉमस्क्युलर पद्धतीने प्रत्येक वेळी 0.5 एम.एल. असे एकूण पाच वेळा म्हणजेच 25 एम.एल. दिली जाते. म्हणजे याचाच अर्थ एका रुग्णाला 25 एम.एल.ची गरज असते. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मात्र श्‍वानदंश लस देण्याबाबत वेगळी पद्धत आहे. तिथे इंट्रॉमस्क्युलर पद्धतीने डाव्या व उजव्या दंडास प्रत्येकी 0.1 एम.एल. असे एकूण चार वेळा म्हणजे 0.8 एम.एल.चा डोस दिला जातो. महापालिकेच्यावतीने इंट्राडर्मल पद्धतीने डोस देण्याची पद्धत सुरू केल्यास 25 एम.एल.ऐवजी 0.8 एम.मध्ये रुग्णाचा कोर्स पूर्ण होऊ शकतो, असे धुत्तरगावकर यांनी पत्रात म्हटले आहे. 

मनपा व शासकीय रुग्णालयातील पद्धती व एम.एल.चा विचार करता मनपाकडून जादा डोस दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. जादा डोस का दिला जातो, याबाबत शंका घेण्यास वाव आहे, असे धुत्तरगावकर यांचे म्हणणे आहे. 

काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत श्‍वानदंश लस खरेदीचा विषय आला होता. यावेळी चर्चा करताना सदस्यांनी श्‍वानदंश लस शासनाकडून मोफत मिळत असतानाही मनपाकडून त्याची खरेदी का केली जाते, असा सवाल उपस्थित झाला होता. जादा डोस तसेच लस खरेदी करण्याचे मनपाचे धोरण पाहता यामध्ये काहीतरी ‘काळेबेरे’ असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून नागरिकांना त्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. मोकाट  कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या रखडलेल्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.