Mon, Jun 17, 2019 04:34होमपेज › Solapur › आंतरवासिता डॉक्टरांचा संप दुसर्‍याही दिवशी सुरूच

आंतरवासिता डॉक्टरांचा संप दुसर्‍याही दिवशी सुरूच

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 9:57PMसोलापूर : प्रतिनिधी 

आंतरवासिता (इंटर्नस) डॉक्टरांचा संप दुसर्‍याही दिवशी सुरुच राहिला. आंतरवासिता प्रशिक्षण घेत असलेल्या सर्व डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला असला तरी या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम जाणवत नसल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या राज्यातील इंटर्नसडॉक्टरांनी बुधवार, 13 जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. सोलापूर येथील डॉ. वैशंपायन शासकीय महाविद्यालयात आंतरवासिता करीत असलेल्या 125 डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला आहे. 

स्टायपंडमध्ये वाढ करण्याची मागणी

एमबीबीएसचा अभ्यासक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दीड वर्षांचा आंतरवासिता अभ्यासक्रम अनिवार्य आहे. शासकीय रुग्णालयात ही सेवा बजाविल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र मिळत नाही. ही सेवा बजावत असताना विद्यार्थ्यांना प्रती दिवस दोनशे रुपयांचे वेतन मिळते. अनेक वर्षांपासून यात वाढ झाली नाही. सध्याच्या महागाईच्या काळात हे वेतन अत्यंत तोकडे असल्याने हे वेतन मासिक सहा हजारांवरून 11 हजार करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी 2015 मध्ये स्टायपंडमध्ये वाढ करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे आंतरवासिता करणार्‍या डॉक्टरांच्या राज्य संघटनेने संपाचे पुन्हा हत्यार उपसले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 125 डॉक्टर आंतरवासिता प्रशिक्षण घेत आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी 99 डॉक्टरांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. गुरुवारी सर्वच डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला. एएसएमआय (असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नस) संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना संपाबाबतचे निवेदन दिले आहे.