Sun, Jul 21, 2019 10:10होमपेज › Solapur › स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ डॉक्टरांची कंत्राटी भरती 

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 51 तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने एकूण 51 तज्ज्ञ डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येत आहे. या निवडीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कक्षात 4 डिसेंबर रोजी थेट मुलाखत घेण्यात येत आहे.

स्त्रीरोग तज्ज्ञांची 17 पदे भरण्यात येत आहेत. यासाठी निवड करण्यात आलेल्या डॉक्टरास 50 हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्यात येत आहे. मात्र यासाठी महिन्यात किमान पाच सिझेरियन केल्यासच मानधन देण्यात येणार आहे. बाळंतपणासाठी प्रति महिलांच्या मागे दीड हजार, सिझेरियन व अन्य मेजर सर्जरीसाठी प्रति रुग्णामागे 4 हजार रुपयांप्रमाणे मानधन देण्यात येत आहे. सोनाग्राफी केवळ एक व अत्यंत हाय रिस्क असल्यास दोन सोनोग्राफीसाठी डॉक्टरांना प्रति रुग्णामागे 400 रुपये देण्यात येत आहे. 

बालरोग तज्ज्ञांचीही 17 पदे कंत्राटी तत्त्वाने भरण्यात येत आहेत. यासाठी दरमहा 75 हजार रुपयांचे मानधन निवड करण्यात आलेल्या डॉक्टरांना देण्यात येत आहे. यासाठीही किमान पाच सिझेरियनची अट लावण्यात आली आहे. दोन हजार रुपये प्रति रुग्णामागे व कामकाज संपल्यानंतर बोलाविण्यात आल्यानंतर प्रति रुग्णामागे हजार रुपये डॉक्टरास देण्यात येणार आहेत. 

भूलतज्ज्ञांचीही 17 पदे भरण्यात येत आहेत. यासाठी प्रति रुग्णामागे डॉक्टरास 4 हजार रुपये देण्यात येत आहेत. नियुक्‍त करण्यात आलेल्या डॉक्टरांची सेवा करमाळा, पंढरपूर, अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय व अक्‍कलकोट, मंद्रुप, वडाळा, बार्शी, पांगरी, नातेपुते, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, करकंब, माढा, कुर्डुवाडी व शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालयात नियुक्‍ती करण्यात येत आहे. 

वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपात असल्याने मार्च 2018 पर्यंत ही पदे अस्तित्वात असतील. वरील पदांसाठी डॉक्टरांना 60 वर्षांपर्यंत वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.