Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Solapur › खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण

खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 1:01AMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

येथील एका डॉक्टरचे अपहरण करून 10 लाख रुपयांची खंडणी दे, नाही तर तुझ्यावर गर्भलिंगनिदानाचा खोटा गुन्हा दाखल करतो, असे म्हणून मारहाण करण्यात आली. दरम्यान, अपहरण झालेल्या डॉक्टरला मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन सोडून देण्यात आले. ही घटना बार्शी शहरातील मंगळवार पेठ भागात व परंडा रस्त्यावर सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

 याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तिघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. डॉ. नंदकुमार रामलिंग स्वामी (वय 48, रा. दत्तनगर, बार्शी) असे अपहरण करून नंतर परंडा रस्त्यावर सोडून देण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. 

ज्ञानेश्‍वर ऊर्फ बप्पा सुरेश लावंड, उमेश चंद्रकांत मस्तुद (वय 33, दोघे रा. सुभाषनगर, बार्शी), रंजना तानाजी वणवे (वय 41, रा. बारामती, जि. पुणे), अनिल शिंदे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), सोमा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी अपहरण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लावंड व मस्तुद या दोघांना मध्यरात्री, तर रंजना वणवे या महिलेला मंगळवारी दुपारी 12.30 वाजता अटक केली आहे.  गुन्ह्यातील दोन्ही वाहनांसह तातडीने तिघांना ताब्यात घेण्यात बार्शी पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्यांवर बार्शी, वैराग, बारामती पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

  डॉ. स्वामी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. डॉ. स्वामी 10 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवरुन शहरातील मंगळवार पेठ भागात कामानिमित्त गेले होते. दरम्यान, तेथे वणवे, ज्ञानेश्‍वर लावंड, उमेश मस्तुद यांनी त्यांच्या दुचाकीसमोर इंडिका कार क्रमांक एमएच 45- 8215 ही आडवी लावून त्यांना मारहाण करुन इंडिका गाडीमध्ये बसवले.

त्यानंतर बार्शी ते परंडा  रस्त्यावरील  इंद्रेश्‍वर साखर कारखान्याकडे जाणार्‍या फाट्याजवळ चौकात त्यांना नेण्यात आले. तेथे दुसरी कार (क्रमांक एमएच 42/ वाय/1011) यामधून अनिल शिंदे, सोमा तेथे आले. त्यानंतर पाचजणांनी मिळून डॉ. स्वामी यांना तुझ्यावर यापूर्वी गर्भलिंगनिदानाचे गुन्हे असून तू भरपूर पैसे कमविलेले आहेत. तू आम्हाला 10 लाख रुपये दे नाही, तर तुला खल्लास करतो, नाहीतर आमच्याकडे सोनोग्राफीचे मशीन आहे, तुझ्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एक महिला आली होती. अशी डमी महिला दाखवून तुझ्यावर गुन्हा दाखल करु, असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. परंडा चौकात हा प्रकार सुरू असल्यामुळे व परिसरातील लोक गोळा होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे डॉ. स्वामी यांना तेथेच सोडून हे पाचही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

मंगळवारी बार्शी न्यायालयात उभे केले असता तिघांनाही 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड हे करत आहेत.