Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Solapur › अवैध गर्भपात प्रकरणातील डॉ. दोशी दाम्पत्याला अटक

अवैध गर्भपात प्रकरणातील डॉ. दोशी दाम्पत्याला अटक

Published On: Jun 22 2018 2:04AM | Last Updated: Jun 21 2018 10:56PMवेळापूर : वार्ताहर 

अवैध गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेले वेळापूर येथील आनंद मॅटर्निटी आणि सर्जिकल नर्सिंग होम या हॉस्पिटलचे डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री दोशी या दाम्पत्यांना दहा दिवसांनंतर कर्नाटकातील एका आश्रमातून अटक करण्यात वेळापूर पोलिसांना यश आले आहे. या अटकेमुळे या गर्भपात प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. 

11 जून रोजी वेळापूर येथील आनंद मॅटर्निटी आणि सर्जिकल नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये जिल्हा शैल्यचिकित्सक यांच्या पथकाने छापा टाकून चार बॉक्स मुदतबाह्य औषधसाठा, गर्भपात करण्याच्या मशिन व साहित्य जप्त केले होते. याप्रकरणी डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री आनंद दोशी यांच्या विरुद्ध अवैध गर्भपातप्रकरणी गुन्हा नोंद करून हॉस्पिटल सील केले होते.  या प्रकरणी अ‍ॅड. रामेश्‍वरी माने यांनी वेळापूर पोलिसांत डॉ. जामदार यांच्या फिर्यादीनुसार तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सन 2013 ते सन 2018 दरम्यान डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री आनंद दोशी या दाम्पत्याने संगनमत करून बेकायदेशीरपणे एकूण 9 महिलांचे डी.एन.सी. केल्याचे आढळून आलेे. त्यापैकी 5 रुग्णांचा गर्भपात केला आहे. 

पुणे जिल्ह्यातील एका महिलेचा दि.8 जून रोजी गर्भपात करून गर्भाची अज्ञात ठिकाणी विल्हेवाट लावली होती. हा गर्भपात केल्यानंतर सदर महिलेची तब्येत गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले होते. तेथे सदर गर्भपात प्रकरणाला वाचा फुटली होती. 

या प्रकरणी  डॉ. जामदार यांच्या फिर्यादीवरून डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री आनंद दोशी यांच्यावर वैद्यकीय गर्भपात कायदा कलम 5 व भादवि 312, 315, 201, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी डॉ. दोशी दाम्पत्यांना चौकशीसाठी वेळापूर पोलिस स्टेशनला आणले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. या घटनेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत अकलूज उपविभागीय  पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूरचे सपोनि परशुराम कोरके व पोलिसांनी डॉक्टर दांम्पत्यांना पकडण्यासाठी दोन पथके नेमली होती.  या डॉक्टर दांम्पत्यांना गुरुवार दि.21 रोजी कर्नाटकातील तवनिरी (ता.चिकोडी.जि.बेळगांव) येथील जैन यांच्या ब्रम्हचर्य आश्रमात अटक करण्यात आली. डॉ. दोशी दाम्पत्य दहा दिवसानंतर पोलिसांच्या हाती लागले आहे.

दरम्यान याकाळात डॉ.आनंद दोशी व डॉ.जयश्री दोशी हे दररोज फोन नंबर व मुक्‍कामही बदलत असल्याने पोलिसांना माहिती मिळूनही अनेक वेळा रिकाम्या हातानी परतावे लागले होते. या दहा दिवसाच्या काळात डॉ.दोशी दांम्पत्यांनी प्रथम मुंबई, कराड, तिरुपती, बेंगलोर व शेवटी जैन आश्रम असा मुक्‍काम व प्रवास केला. 

पोलिसांनी आश्रमातून अटक केल्यानंतर दुपारी 2 वा.च्या आसपास वेळापूर पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले. या शोध मोहिमेत  सपोनि परशुराम कोरके यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत झोळ, लक्ष्मणराव पिंगळे, दत्ता खरात, अमोल वाघमोडे, अश्‍विनी पवार यांनी काम पाहिले.