Sat, Jul 20, 2019 23:33होमपेज › Solapur › ज्ञानोबा, तुकारामांच्या गजरात भगवंत रथोत्सव उत्साहात

ज्ञानोबा, तुकारामांच्या गजरात भगवंत रथोत्सव उत्साहात

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 8:59PMबार्शी : तालुका प्रतिनिधी

प्रति पंढरपूर अशी ओळख  असलेल्या बार्शी येथील भगवंत मंदिरात सोमवारी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पूर्वापारपणे चालत आलेल्या  धार्मिक परंपरेनुसार आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानोबा माऊली, तुकारामाच्या गजरात श्री भगवंत उत्सव मूर्तीची रथयात्रा मोठ्या उत्साहात निघाली होती. 

ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत बार्शी शहरातील मुख्य  मार्गावरुन रथयात्रा सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा  उभे असलेल्या हजारो भाविक भक्तांनी श्री भगवंत उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी उभ्या असलेल्या भाविकांनी खारीक, खोबरे, विविध प्रकारची फुले इत्यादींची उधळण भगवंताच्या रथाच्या दिशेने  केली. आषाढी  एकादशीनिमित्त व पवित्र दिवसानिमित्त भगवंत मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच बार्शी शहर व तालुक्यातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केलीली होती. पहाटे  काकड आरतीचा नित्योपचार झाल्यानंतर अभिषेक करण्यात आला.सकाळी  गरुडावर आरुढ झालेल्या  श्री भगवंताच्या उत्सव मुर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी  मंदिरातील  बडवे  मंडळीही  परंपरागत पोशाख परिधान करुन उपस्थित होते. भगवंत मंदिरासमोरून रथयात्रा सुरू झाली. महाद्वार चौक, पटेल चौक, कापड गल्ली, पांडे चौक मार्गे श्रीराम मंदिर येथे रथोत्सव आल्यानंतर रथयात्रेचा  समारोप करण्यात आला. बार्शीसह लगतच्या मराठवाड्यातील उस्मानाबाद, येडशी, येरमाळा, भूम, परंडा आदींसह तालुक्यातील घारी, पुरी, कुसळंब, जामगाव, उपळाई ठोंगे, आगळगाव, गाताचीवाडी आदी अनेक गावातील भगवंत भक्तांनी बार्शीत दिंडीने येऊन श्री भगवंताचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.आषाढी एकादशीनिमित्त बार्शी शहर व तालुक्यातील सर्व वारकर्‍यांना व ग्रामस्थांना मसाला दूध, चहाचे मोफत वाटप करण्यात आले.

गाताचीवाडीत फराळाचे वाटप

गाताचीवाडी, ता. बार्शी येथील ग्रामस्थांच्यावतीने भूम-बार्शी मार्गावरून बार्शी येथे भगवंताच्या दर्शनासाठी पायी चालत जाणार्‍या शेकडो भाविकांना गाताचीवाडी येथील चौकात फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील सर्व तरूण युवकांसह ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. गावातील सर्व तरूण व नागरिकांनी यासाठी परिश्रम घेतले. पाच हजार वारकर्‍यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात आले.