Sat, Mar 23, 2019 16:16होमपेज › Solapur › डीपीसीची आज बैठक 

डीपीसीची आज बैठक 

Published On: Jan 02 2018 1:17AM | Last Updated: Jan 01 2018 11:02PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी  

तब्बल एक वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस मुहूर्त लागला असून आज, मंगळवारी होणार्‍या या  बैठकीत   मागील सन 2017-18 च्या खर्चाचा  आढावा, तर सन 2018-19 चे नियोजन केले जाणार आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होणे अपेक्षित आहे. या बैठकीत विविध विभागांनी विकासकामांवर केलेल्या खर्चाचा आढावा घेतला जातो. सुरू  असलेल्या कामांमध्ये येणार असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे ही बैठक ठरल्याप्रमाणे तीन महिन्याला होणे अपेक्षित आहे. मात्र, चालू वर्षात निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अद्याप सन 2017-18 मधील एकही बैठक घेता आलेली नाही. राज्य शासनाने चालू वर्षातील 275 कोटींच्या आराखड्यास मान्यता दिली होती; मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे आचारसंहिता लागली. त्यामुळे बैठक घेता आली नाही. या निवडणूक निकालानंतर नियमानुसार जुनी समिती बरखास्त करण्यात आली. नवीन समिती नियुक्‍त करणे, निवडणूक प्रक्रिया राबविणे यामध्ये दीड ते दोन महिन्यांचा कालावधी गेला. निवडणूक होऊन नवीन सदस्यांची नियुक्‍ती झाली; मात्र पुन्हा जिल्ह्यातील 192 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली,  तर पुन्हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 64 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे   डीपीसीची बैठक झाली नव्हती; मात्र या बैठकीस नवीन वर्षाच्या सुरुवातीस मुहूर्त लागला असून ही बैठक आज, मंगळवारी होणार आहे. या बैठकीत मागील वर्षीच्या खर्चाचा आढावा तसेच पुढील वर्षीच्या खर्चाचे नियोजन केले जाणार आहे. सन 2017-18 साठी 244 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध होता. त्यापैकी  आजअखेर 227 कोटी 86 लाखांचे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत 156 कोटी खर्च म्हणजे 64 टक्के निधी खर्च झाला आहे. सन 2018-19 साठी 322 कोटींचा आराखडा मान्यतेसाठी बैठकीत ठेवण्यात येणार आहे.