Wed, Apr 24, 2019 01:29होमपेज › Solapur › जिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणास सहकार भारतीचा विरोध

जिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणास सहकार भारतीचा विरोध

Published On: Dec 24 2017 1:47AM | Last Updated: Dec 23 2017 9:54PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  

राज्यात डबघाईला आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र, यास सहकार भारतीचा विरोध असल्याची माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचारक भालचंद्र कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी महापौर निवासात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सहकार भारतीचे महाराष्ट्राचे महासचिव विनय खटावकर व प्रांत संघटक अनिल वळसंगकर सोलापूर दौर्‍यावर आले होते.  कुलकर्णी म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँका या शेतकर्‍यांच्या बँका आहेत. या बँकांमार्फत शेतकरी जोडला गेला आहे. मात्र, काही जिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र, यास सहकार भारतीचा विरोध असून असे झाले तर सहकारावरच घाला घातल्यासारखे होईल.  सोसायट्यांमार्फतच कर्जवाटप झाले पाहिजे, अशी सहकार भारतीची भूमिका आहे.

सहकार भारती ही सहकार क्षेत्रात गेली 47 वर्षांपासून कार्यरत पंजीकृत अशासकीय संस्था आहे. सहकार चळवळीला जनकल्याणकारी स्वरूप देऊन अधिक मजबूत तसेच सर्वव्यापी करणे हा सहकार भारतीचा  स्थापन करण्याचा उद्देश असून सहकारी बँकांतील 10 लाखांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे तसेच व्यवस्थापन समिती नियुक्‍त करण्यास विरोध आदी सहकार भारतीच्या मागण्या आहेत.

यावेळी सहकार भारती महाराष्ट्राचे महासचिव विनय खटावकर यांनी सहकार भारतीच्या संपर्क अभियानाची माहिती दिली. पहिल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 11 जानेवारीपासून 28 फेबु्रवारीपर्यंत संपर्क अभियान राबविण्यात येणार असून सहकार भारतीचे सर्व कार्यकर्ते तालुका स्तरावर जाऊन सर्वच सहकारी संस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. दुसर्‍या वर्षी म्हणजे  2018-19 या वर्षात जवळीकता हे उद्दिष्ट, तर तिसर्‍या वर्षी म्हणजे 2019-20 मध्ये गुणात्मक प्राबल्य ही उद्दिष्ट्ये असणार आहे.
सहकार क्षेत्र मोठे झाले प्राहिजे ही सहकार भारतीची भावना असून यासाठी सहकार भारती सतत प्रयत्नशील असल्याचेही खटावकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहकार भारतीचे प्रांत संघटक अनिल वळसंगकर, दिलीप पतंगे, दामोधर देशमुख, संतोष गायकवाड, अजय निकुंब, किरण करकंबकर, शिवानंद बोरवणे  आदी उपस्थित होते.