Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Solapur › सहकार-पालकमंत्र्यांमध्ये पुन्हा रस्सीखेच!

सहकार-पालकमंत्र्यांमध्ये पुन्हा रस्सीखेच!

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 11:13PMसोलापूर : महेश पांढरे 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपून जवळपास तीन महिने लोटले तरी अद्याप शासनाच्या आदेशान्वये विशेष निमंत्रित सदस्य अर्थात तज्ज्ञ संचालकांच्या निवडी झालेल्या नाहीत. त्यामुळे या तज्ज्ञ संचालकांच्या निवडीवरून पुन्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात रस्सीखेच होणार असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.

सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका एकत्रितपणे पार पडल्या होत्या. त्यामुळे तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीचा कार्यक्रमही एकत्रितपणेच व्हायला हवा होता. मात्र बार्शी बाजार समितीवर तज्ज्ञ संचालकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तज्ज्ञ संचालकांच्या निवडी का रखडल्या आहेत, असा सवाल आता भाजपच्याच कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. यासाठी सहकारमंत्री परदेशी गेले असून ते आल्यानंतर या निवडी करण्यात येतील, अशी उत्तरे दिली जात आहेत. 
मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्र्यांनी सर्वसामान्य लोकांना मतदानाचा अधिकार देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र या निवडणुकीत सहकारमंत्र्यांच्या पॅनलला अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे किमान तज्ज्ञ संचालकांच्या चार जागांवर तरी सहकारमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. गतवेळच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असणार्‍या शिवसेना मित्रपक्षाला एक जागा देण्यात आली होती, तर पालकमंत्री एक, खासदार एक आणि सहकारमंत्री एक जागा देण्यात आली होती. यावेळचा काय फार्म्युला असणार, हे अद्याप स्पष्ट झालेला नाही. 

यंदाच्या नियुक्तीमध्ये काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ज्या बाजार समितीची वार्षिक आर्थिक उलाढाल 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे अशा बाजार समितीवर विशेष निमंत्रित तज्ज्ञ संचालक किमान चार निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरही चार संचालकांची वर्णी लागणार आहे.  यामध्ये सहकारमंत्री कोणाकोणाला संधी देणार आणि यामध्ये पालकमंत्री आणि मित्रपक्ष शिवसेनेला स्थान मिळणार की नाही, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

खासदार आणि मित्रपक्ष सेनेला स्थान मिळणार का?
सोलापूर बाजार समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्याच्या तज्ज्ञ संचालकांच्या निवडीमध्ये भाजप खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार का, असा विषय आता ऐरणीवर आला असून याबाबतीत सहकारमंत्री आणि पालकमंत्री काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.