Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Solapur › आंदोलनाची दिशा सोलापुरात ठरणार

आंदोलनाची दिशा सोलापुरात ठरणार

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 11:32PMसोलापूर : प्रशांत माने

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून, संपूर्ण राज्यातील मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील सर्व समन्वयकांची बैठक लवकरच सोलापुरात होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे यांनी दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 

क्रांती मोर्चाच्या राज्यातील सर्व समन्वयकांशी संपर्क साधण्यात येत असून, येत्या चार दिवसांत बैठकीची तारीख, ठिकाण आणि वेळ जाहीर होणार असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सोलापुरात मोर्र्चे, बंद, आंदोलन सुरू असून, अनेक ठिकाणी आंदोलनास हिंसक वळणही लागले आहे. आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केल्याने राज्यातील अनेक भागांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मराठा समाजाने संपूर्ण राज्यात 1 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन पुकारले; परंतु सोलापुरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असल्याने येथील मराठा समाजाने शहरातील जेलभरो आंदोलन पुढे ढकलेले आहे. तर, ग्रामीण भागात काही ठिकाणी रास्ता रोकोसारखे आंदोलन सुरूच आहे. आरक्षण मागणी आणि आंदोलन या सर्व पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे सोलापुरातील नेते दिलीप कोल्हे यांच्याशी संपर्क साधला.

दिलीप कोल्हे यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यातील पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या काही दिवसांत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांची बैठक सोलापुरात आयोजित केली जात आहे. सर्व समन्वयकांना संपर्क साधण्यात येत आहे. राज्यातील सुमारे 50 समन्वयक या बैठकीस उपस्थित राहतील. बैठकीची तारीख, ठिकाण आणि वेळ येत्या चार दिवसांत जाहीर करणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला, तरी आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत लोकशाहीमार्गाने आंदोलन सुरूच राहणार आहे. मराठा समाजाचे आंदोलन हे आरक्षणासाठी असून मुख्यमंत्र्यांविरोधात नसल्याचेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.