Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Solapur › विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

 काँग्रेसचे माजी आ. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आ. दिलीप माने यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

माजी आ. नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून अनेक इच्छुकांची तयारी होती; मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सहकार्याने माजी आ. दिलीप माने यांच्यावर विश्‍वास टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने आ. माने यांना ही उमेदवारी दिली आहे. यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत आहे. तर माने सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी प्रदेश काँगे्रसचे अनेक नेतेमंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सध्या ही निवडणूक राज्यपातळीवर होणार असल्याने काँग्रेसच्या अस्तित्वाची तर भाजपच्या प्रतिष्ठेची असणार आहे.  भाजपकडून प्रवक्ते माधव भंडारी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे नारायण राणे हे या निवडणुकीत काय करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही निवडणूक जिंकण्यासाठी 145 आमदारांची गरज असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे 81 मतांची बेरीज आहे. त्यामुळे या निवडणुकीचे स्पष्ट चित्र निकालानंतरच कळून येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर काँग्रेसमधील वजनदार नेता म्हणून माने यांची चर्चा आहे. तर माने यांचे सोलापूर जिल्ह्यात चांगले वजन असून या उमेदवारीमुळे माने यांचे आता मुंबई दरबारीही वजन वाढणार आहे. स्व. माजी आ. ब्रम्हदेवदादा माने यांच्यानंतर राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवण्यात दिलीप माने यशस्वी झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तथा दोन साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून माने यांनी सोलापूरच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण केला आहे.