Sun, Mar 24, 2019 04:53होमपेज › Solapur › धुळे हत्या प्रकरणी पालकमंत्र्याचे शासकीय मदतीचे आश्वासन

धुळे हत्या प्रकरणी पालकमंत्र्याचे शासकीय मदतीचे आश्वासन

Published On: Jul 02 2018 5:57PM | Last Updated: Jul 02 2018 5:58PMमंगळवेढा  : तालुका प्रतिनिधी

प्रत्येकी दहा लाख मदत तसेच वारसाना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी घरकुल सारख्या योजनेतून घर  देण्याचे आश्वासन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज प्रांत कार्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर धुळ्यात झालेल्या मारहाणीतील मृतांच्या कुटुंबियाना दिले.

विजयकुमार देशमुख हे नाथ पंथी डवरी गोसावी समाजाच्या खवे आणि मानेवाड़ी येथील चार भिक्षुकांच्या हत्येनंतर त्यांच्या समाजाच्या सांत्वनासाठी सोमवारी मंगळवेढा येथे आले होते. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी मोबाइलवरुन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस याच्याशी संपर्क साधत ही मदत त्यांच्या वतीने उपस्थित डवरी समाजाच्या लोकांना बोलून दाखवली.

या वेळी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. येताळा भगत, डवरी समाजाचे नेते मछिन्द्र भोसले, आरपीआयचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड,  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, अशोक माळी, गौरीशंकर बुरकुल, औदुंबर वाडदेकर, शुभांगी सूर्यवंशी उपस्थित होते. 

दरम्यान, सोमवारी सकाळी आमदार भारत भालके यांच्या संपर्क कार्यलयात समाजाच्या शेकडो लोकांनी भालके यांची भेट घेतली. या वेळी भालके यांनी भिक्षा मागण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र असताना देखील याचा विचार न करता त्यांची हत्या केली. या प्रकरणात धुळे पोलीस प्रमुखांशी बोललो असून यातील आरोपींना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध चालूच असल्याचे सांगितले आहे. असे  असले तरी वारसांना मदत व नोकरीचे आश्‍वासन सरकारने दिल्याशिवाय अंत्यविधी होऊ देणार नाही उद्याच्या अधिवेशनात या बाबत ठोस भूमिका स्पष्ट झाल्याखेरीज गप्प बसणार नाही असे यांनी सांगितले होते.  

उद्या मंगळवेढा बंदची हाक 

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या निर्दयी हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी मंगळवेढा बंदचे आवाहन समस्त तालुका सर्व पक्षीयांच्या वतीने केले आहे. तसेच दुपारी बारा वाजता मारुतीच्या पटांगणात श्रद्धांजली, शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.