Wed, Jun 26, 2019 17:49होमपेज › Solapur › धुळे हत्या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखाची मदत

धुळे हत्या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखाची मदत

Published On: Jul 02 2018 3:56PM | Last Updated: Jul 02 2018 4:05PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाड़ी येथील नाथपंथी डवरी समाजाच्या चार भिक्षुकाना धुळे येथील साक्रीमध्ये चोर समजून नागरिकांनी बेदम मारहाण करीत त्यांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी हत्या झालेल्या भिक्षुकांचे रात्रीच शवविच्छेदन झाले होते. परंतु कुटुंबप्रमुख अकाली  गेल्याने त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि वारसांना नोकरीची हमी तसेच आरोपीना कठोर शिक्षा दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेतले जाणार नाही अशी भूमिका कुटुंबियानी घेतली होती. दरम्यान, सरकारने चर्चेअंती मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहीर केली. त्यामुळे आता नातेवाईक मृतदेह स्विकारण्याची शक्यता आहे.

सध्या जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, तहसीलदार आणि नातेवाईक यांच्यात बैठक सुरु असुन प्रेत ताब्यात घेण्यास अद्यापही नातेवईकांनी नकार दिला आहे. ते आपल्या मागण्यावर ठाम आहेत.  मंगळवेढ्यातून घटना समजताच रात्री मारुती भोसले, शिवाजी चौगुले, दिगंबर माळवे या तिघांसह मारुती रेडडी, शहानुर फकीर हे मित्र प्रेत ताब्यात घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर कडे रवाना झाले. 

सध्या या ठिकाणी पोलिसाशिवाय कोणीच नसून कुटूंबातील कर्त्याची हत्या झाल्यामुळे कुटूंब उघड्यावर पडले असून शासनाने याबाबत अद्यापही कुटूंबाच्या सुरक्षिततेविषयी तसेच वारसाच्या मदतीसाठी कोणतीच भूमिका न घेतल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत.  दरम्यान, धुळ्यातील साक्री येथील मारहाण केलेले नागरिक ही पसार झाले असून गावात फक्त महिलावर्गच शिल्लक आहे.

भिक्षा मागण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र असताना देखील याचा विचार न करता हत्या केली. या प्रकरणात धुळे पोलीस प्रमुखाशी बोललो असून यातील आरोपीला अटक केली असून आणखी आरोपीचा शोध चालूच असल्याचे प्रशासनाने सांगितले. असे असले तरी वारसांना मदत व नोकरीचे आश्‍वासन सरकारने दिल्याशिवाय अंत्यविधी होऊ देणार नाही उद्याच्या अधिवेशनात या बाबत ठोस भूमिका स्पष्ट झाल्या खेरीज गप्प बसणार नाही असे आमदार भारत भालके  यांनी सांगितले होते.