Fri, Apr 26, 2019 00:14होमपेज › Solapur › उशिरा गाळपास येणार्‍या उसाला जादा दर : काडादी

उशिरा गाळपास येणार्‍या उसाला जादा दर : काडादी

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 8:56PMसोलापूर : प्रतिनिधी

येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात 15 फेब्रुवारीनंतर गाळपास येणार्‍या सभासदांच्या उसाला जादा दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली. 2017-18 या गळीत हंगामात उसाचे एकरी उत्पादन सुमारे 8 ते 10 मेट्रिक टनाने नैसर्गिकरित्या वाढल्याने ऊसतोडणी कार्यक्रम लांबत चालला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील काही भागांमध्ये अपुर्‍या पावसामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली असून अनेक सभासद शेतकर्‍यांचा ऊस पाण्याअभावी वाळत असल्याने गाळपासाठी तो लवकर नेण्याची मागणी होत आहे. 

प्रतिवर्षी कारखान्यामार्फत उशिरा गाळपास येणार्‍या उसाला जादा दर देण्यात येतो. त्याचप्रमाणे याहीवर्षी नुकसानभरपाई म्हणून जादा दर देण्याचे धोरण संचालक मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत गाळपास येणार्‍या उसाला प्रतिटन 50 रुपये, 1 मार्च ते 15 मार्चपर्यंत प्रतिटन 100 रुपये, 16 मार्च ते 31 मार्चपर्यंत येणार्‍या उसाला प्रतिटन 150 रुपये, तर 1 एप्रिल ते हंगाम बंद होईपर्यंतच्या उसाला प्रतिटन 200 रुपये जादा दर देण्यात येणार असल्याचेही काडादी यांनी सांगितले. 

चालू गळीत हंगामाची एफआरपी तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता प्रतिमेट्रिक टन 2070 इतकी आहे. मात्र कारखान्याने नोव्हेंबरमध्ये 2200 रुपये प्रतिमेट्रिक टन दर जाहीर केला होता. त्यावेळेचे बाजारातील साखरेचे असणारे चांगले दर व सभासद शेतकर्‍यांची एफआरपीपेक्षा जादा उचल मिळण्याची असलेली भावना विचारात घेऊन एफआरपी 2070 व वाढीव 130 रुपये प्रतिमेट्रिक टन असे 2200 रुपये पहिली उचल जाहीर केली होती. त्यानुसार 15 डिसेंबर 2017 अखेर गाळपास आलेल्या उसाचे पेमेंटही अदा केले असल्याचेही काडादी यांनी सांगितले. कारखान्याने ऊसदर प्रतिमेट्रिक टन 2200 रुपये जाहीर केला. त्यावेळी बाजारातील साखरेचे दर 3500 ते 3550 प्रतिक्‍विंटल इतके होते. मात्र, अनपेक्षितपणे मागील एक महिन्यात साखरेचे दर घसरून ते 2800 ते 2900 रुपये इतके झाले आहेत. साखरेचे दर स्थिर राहण्याच्यादृष्टीने व दर वाढीसाठी केंद्र शासनाकडून अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे साखरेचे दर घसरतच चालले आहेत. कमी झालेल्या साखरेच्या दरामुळे कारखान्यास पतपुरवठा करणार्‍या बँकेने साखरेचे मूल्यांकन दर प्रतिक्‍विंटल 3050 रुपये इतके कळविले असून 15 टक्के मार्जिन वजा जाता 2592.50 रुपये प्रतिटन उपलब्ध होत आहेत. प्रक्रिया खर्च वजा जाता ऊस पेमेंट करण्याकरिता बँकेकडून प्रतिमेट्रिक टन 1442.50 पैसे उपलब्ध होणार आहेत.