Mon, Aug 26, 2019 00:06होमपेज › Solapur › धनगर समाजाचा शुक्रवारी सोलापुरात मोर्चा

धनगर समाजाचा शुक्रवारी सोलापुरात मोर्चा

Published On: Aug 22 2018 12:10AM | Last Updated: Aug 22 2018 12:10AMसोलापूर : प्रतिनिधी

आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी येत्या शुक्रवारी धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयात समाजबांधव, कार्यकर्ते व नेत्यांसमवेत पोलिस आयुक्तांची बैठक पार पडली. हे आंदोलन लोकशाही मार्गाने, शांततेत पार पाडू असे, आश्‍वासन आंदोलकांनी यावेळी दिले. 

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी समाजाच्यावतीने शुक्रवारी (24) सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा काढला जाणार असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. सकाळी 11 ते 5 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्‍वासनही नेत्यांनी पोलिसांना दिले आहे.

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीत (एसटी) करण्यात यावा तसेच नोकरी व शैक्षणिक आरक्षण मिळावे यासाठी समाजाच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सोलापुरातदेखील आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. यासंदर्भात समाजातील पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करण्यासाठी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला नगरसेवक चेतन नरोटे, प्रा. शिवाजीराव बंडगर, अर्जुन सलगर, रामभाऊ खांडेकर, परमेश्‍वर कोळेकर, बंडू भोसले, विलास पाटील, बाळासाहेब शेळके, पवन पाटील, शेखर बंगाळे, अमोल कारंडे, निमिषा वाघमोडे, निर्मलाताई पाटील, माशाळ यांच्यासह 50 ते 55 पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. पोलिस विभागाकडून पोलिस आयुक्तांसह उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलिस आयुक्त सकळे, दीपाली काळे, अभय डोंगरे, आर.एन. चोपडे, इतर पोलिस ठाणे, शाखा प्रभारी यांची उपस्थिती होती. प्रा. बंडगर यांनी पोलिस आयुक्तांचे बैठक बोलावल्याने आभार मानले.

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी हा महत्त्वाचा विषय आहे. आम्ही सर्व आंदोलने शांततेत केली आहेत तसेच शुक्रवारचे आंदोलनही कोणतेही गालबोट न लावता शांततेत पार पाडू असे, असे आश्‍वासन यावेळी देण्यात आले. अर्जुन सलगर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीकरिता आंदोलन शांततेत पार पडणार असल्याचे सांगितले. चेतन नरोटे यांनी आम्ही मागील मोर्चे शांततेत पार पाडले आहेत. त्याचप्रमाणे हेदेखील आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पदाधिकार्‍यांना आम्ही सूचना देऊ, कोणीही आत्मदहनाचा वगैरे प्रकार करणार नाहीत, असे सांगितले.

पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी मागील आंदोलनाप्रमाणेच हे आंदोलनही शांतेत पार पाडणार याबाबत शंका नसल्याचे सांगितले. यापूर्वी आंदोलनात पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. संवाद साधूनच प्रश्‍न सोडविण्यावर आमचा दृढ विश्‍वास आहे. सोलापूर हे चळवळीचे गाव आहे. शहरात बाहेरील घटनांचे कधीही पडसाद उमटले नाहीत. आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत, आपल्या मागण्या प्रचलित कायद्याचे पालन करुन व्यक्त कराव्यात, असे आवाहन केले.