Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Solapur › नळदुर्ग येथे धनगर समाजाचा रास्ता रोको

नळदुर्ग येथे धनगर समाजाचा रास्ता रोको

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 11:16PMनळदुर्ग : प्रतिनिधी 

धनगर समाजाला न्याय देण्यास शासन चालढकल करीत असून  जि.प. सदस्या सक्षणा सलगर यांनी  राज्य शासनावर जोरदार टीका करून शासनाने धनगर समाजाच्या मागण्या त्वरित मान्य करण्याचे नळदुर्ग येथे रास्ता रोकोप्रसंगी सांगितले.

धनगर समाजास अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे, घोषणेप्रमाणे सोलापूर विद्यापीठ अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी नळदुर्ग येथे शुक्रवार, 13 एप्रिल रोजी धनगर समाजाने नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानकासमोर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी किल्ला गेट येथून धनगरी ढोल व इतर वाद्यांच्या गजरात प्रचंड संख्येने धनगर समाज बांधवांनी शांततेत मोर्चा काढला. हा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून बसस्थानक येथे राष्ट्रीय महामार्गावर पोहचल्यानंतर ठिय्या मांडून रास्ता रोको करण्यात आला. 

यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन मंडल अधिकारी अमर गांधले यांना दिले. जि.प. सदस्या सक्षणा सलगर, माजी जि.प. सदास्य गणेश सोनटक्के, वैष्णवी कागे, रणवीर चैरे, जयश्री घोडके यांच्यासह अनेकांनी  भाषण केले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते, लोहाराच्या नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, संजय घोडके, सुनील खटके, नगरसेवक विनायक अहंकारी, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले, सोमनाथ गुड्डे, मंडल अधिकारी अमर गांधले, तलाठी  तुकाराम कदम, पदाधिकारी, धनगर समाजातील स्त्री-पुरूष व तरूणांसह असंख्य नागरिक उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तांबे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Tags : solapur naldurg, dhangar community