Sun, May 26, 2019 09:16होमपेज › Solapur › सराईत गुन्हेगार धनराज दंदाडे स्थानबद्ध

सराईत गुन्हेगार धनराज दंदाडे स्थानबद्ध

Published On: Feb 28 2018 1:11AM | Last Updated: Feb 27 2018 9:34PMसोलापूर : प्रतिनिधी

आयुक्‍तालयाच्या  विविध पोलिस ठाण्यांमध्ये   गंभीर  गुन्हे  दाखल असलेला सराईत गुन्हेगार धनराज कमलाकर दंदाडे (वय 33, रा. हब्बू वस्ती, देगाव नाका, सोलापूर) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत दुसर्‍यांदा स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. दंदाडे यास घेऊन पोलिस पथक येरवड्याकडे रवाना झाले आहे.

धनराज दंदाडे हा फौजदार चावडी, जोडभावी पेठ, सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. दंदाडे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करतो. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना शस्त्राने धमकाविणे, मारहाण करुन बळजबरीने लुटणे, मारहाण करणे अशाप्रकारची गुन्हेगारी कृत्ये करतो. त्यामुळे परिसरामध्ये दंदाडेची दहशत निर्माण झाली आहे. 

दंदाडेविरुद्ध फौजदार चावडी, जोडभावी पेठ, सदर बझार पोलिस ठाण्यामध्ये शरीराविषयी व मालाविषयी 9 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन 2006 मध्ये एमपीडीए कायद्यानुसार स्थानबध्द करण्यात आले होते तसेच 2008 व 2010 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. 

दंदाडे याने जानेवारी 2018 मध्ये त्याच्या साथीदारांसह बेकायदेशीररित्या जमाव जमवून शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याबाबतचा गुन्हा फौजदार चावडी पोलिस  ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दंदाडे याच्याविरुद्ध वेळोवेळी कारवाई करुनसुध्दा त्याच्या वर्तनामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही म्हणून त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी त्याला एमपीडीएअंतर्गत दुसर्‍यांदा स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, हवालदार राजू ओहोळ, नवनीत नडगेरी, विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव यांनी केली.