Mon, May 27, 2019 07:48होमपेज › Solapur › चंद्रभागेतील शेवाळयुक्‍त पाण्यात भाविकांचे स्नान

चंद्रभागेतील शेवाळयुक्‍त पाण्यात भाविकांचे स्नान

Published On: May 18 2018 12:34AM | Last Updated: May 17 2018 11:36PMपंढरपूर : प्रतिनिधी

अधिकमासास प्रारंभ झाल्यामुळे श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. चंद्रभागा स्नान उरकून भाविक दर्शन घेत आहेत. मात्र नदीपात्रात कमी पाणी तेही शेवाळयुक्‍त असल्याने  दुषीत पाण्यातच भाविकांना स्नान उरकावे लागत आहे. अधिकमासात तरी नदीपात्रात पाणी सोडून भाविकांना स्नान करण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी भाविकातून होत आहे.
यावर्षी अधिकमास आल्याने पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. यातच शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याने सहकुटुंब दर्शनाकरिता भाविक येत असल्याचे दिसते. अधिक महिन्याच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी पंढरी भाविकांनी  गर्दी झाली होती. चंद्रभागा  स्नान श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांग व मंदिर परिसरात गर्दी होत आहे. मंदिर समितीच्यावतीने भाविकांना चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, सभा मंडप, मंदिर परिसर या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छतादूत नेमले आहेत.

राज्याच्या कानाकोपर्‍यातून महिनाभर भाविक पंढरीत ये जा करणार आहेत. आलेल्या भाविकांच्या दृष्टिने चंद्रभागा स्नान करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे नदीपात्रात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. परंतु नदीपात्रात चैत्री यात्रेकरिता सोडण्यात आलेल्या पाण्यानेच गोपाळपूर येथील बंधारा भरून घेण्यात आल्याने भाविकांसाठी सद्या जेमतेम पाणी स्नानाकरिता शिल्लक आहे. या पाण्यात निर्माल्य, फाटकी कपडे, शिळे अन्न, पादत्राणे टाकून पाणी अधिक दुषित झाले आहे. याच पाण्यात आता शेवाळ मोठ्या प्रमाणात उदभवले आहे. शेवाळ पाण्यावर तरंगत असल्याने स्नान करताना भाविकांना त्रासदायक ठरत आहे. हाताने शेवाळ बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर ते विरघळून त्याचे लहान तुकडे पाण्यात मिसळत असल्याने भाविकांना शेवाळयुक्‍त पाण्यातच स्नान करावे लागत आहे. अधिकतर भाविक स्नान करणे टाळत प्रशासनाविषयी नाराजी  व्यक्‍त करत आहेत. कासार घाट ते गोपाळपूर बंधार्‍यापर्यंत पाण्यावर शेवाळाचे आच्छादन तयार झाले आहे. तर पुंडलिक मंदिरासमोरही शेवाळ पसरले आहे. या शेवाळाचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा अथवा उजनीतून नदीपात्रा पाणी सोडून बंधारा भरून घेण्यात यावा अशी मागणी भाविकातून होत आहे.