Sun, May 26, 2019 11:30होमपेज › Solapur › स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा

स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 9:54PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी यासह विविध मागण्यांसाठी पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी राज्य व्यापी आंदोलन करण्यात आले. राज्यातील विविध जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय समोरही आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रांताधिकार्‍यांच्यावतीने शिरस्तेदार अजित पवार यांनी निवेदन स्वीकारले.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, गटई कामगारांप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिकृत परवाना मिळावा, शासकीय घरकूल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, विक्रेता संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकार्‍यांना एस.टी.तून मोफत प्रवास मिळावा, शासकीय वस्तिगृहात संघटनेच्या लेटर पॅडवर सवलतीच्या दरात बैठकीस परवानगी द्यावी, विधान परिषदेवर असंघटीत कामगारांचा प्रतिनिधी घेण्यात यावा,  यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष गोरख भिलारे, संघटनेचे अध्यक्ष महेश पटर्धन, उपाध्यक्ष मुकुंद हरिदास, तेंडुलकर बंधू, वाटाणे बंधू, ताठे बंधू, नलवडे बंधू, बिडवे बंधू, हरी कदम,  नंदकुमार देशपांडे, लक्ष्मण कारटकर, संतोष कुलकर्णी, सतिश लाड, विकास पवार, फावडे, मोरे, वाघमोडे, जोशी, भोसले, रविकिरण पाटील, गाजरे, भाकरे, माळवदकर, शिवकुमार भावलेकर यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार बांधव उपस्थित होते.