Sun, Jul 21, 2019 16:36
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › वादळी चर्चेनंतर ड्रेनेजचा मक्‍ता मंजूर 

वादळी चर्चेनंतर ड्रेनेजचा मक्‍ता मंजूर 

Published On: Apr 08 2018 10:19PM | Last Updated: Apr 08 2018 9:35PMसोलापूर : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित ठरलेला 174 कोटींच्या ड्रेनेज योजनेचा मक्ता मंजूर करण्याच्या विषयावरुन शनिवारी महापालिका सभेत तीन तास वादळी चर्चा झाली. राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी  या योजनेसंदर्भात अभ्यासपूर्णपणे प्रश्‍नांची सरबत्ती करून अनियमिततेकडे सभेचे लक्ष वेधले. 

केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत सोलापूर शहरासाठी 174 कोटींची ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदाचा वाद न्यायालयात असल्याने सभागृहनेते संजय कोळी यांच्या मागणीवरुन या ड्रेनेज मक्त्याचा विषय प्रशासनाने थेट सर्वसाधारण सभेकडे पाठवून दिला. यावरुन शनिवारी महापालिका सभेत मोठा खल झाला. विरोधी सदस्यांबरोबरच सत्ताधारी सदस्यांनीही अनेक प्रश्‍नांचा भडिमार करुन या विषयाबाबत प्रशासनाला घाम फोडला.

मनपाची तहकूब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे उपस्थित होते. सभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच ड्रेनेज योजनेबाबत सादरीकरण करण्यात येऊन हा विषय प्राधान्याने चर्चेला घेण्यात आला. सूचना-उपसूचना मांडून झाल्यावर काँग्रेसचे गटनेते किसन जाधव यांनी या योजनेबाबत अनेक प्रश्‍न विचारुन या योजनेसंदर्भातील अनियमितता दाखविण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते महेश कोठे, बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनीदेखील याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. 

सायंकाळी पाच वाजता या विषयावर सुरु झालेली चर्चा नऊ वाजेपर्यंत चालली. नागेश वल्याळ यांनीदेखील प्रशासनाला या योजनेबाबत भंडावून सोडल्याने सभागृह नेते संजय कोळी यांची या सभेत चांगलीच गोची झाल्याचे पहावयास मिळाले. तीन तास वादळी चर्चा होत असूनही एकमत होत नसल्याने या विषयावर मतदान होईल, असे वातावरण निर्माण झाले. याबाबत गटनेत्यांनी डायससमोर येऊन महापौरांशी चर्चा केली. दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गटनेते चेतन नरोटे यांना मोबाईलवर  प्रस्तावाला साथ द्या, अशी सूचना केली. त्यानुसार नरोटे यांनी पाठिंबा जाहीर केल्यावर विषय बहुमताने मंजूर करण्यात आला.