Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Solapur › पालखी तळ भूसंपादन  नुकसानभरपाईचा निर्णय शिखर समिती घेईल : विभागीय आयुक्‍त

पालखी तळ भूसंपादन  नुकसानभरपाईचा निर्णय शिखर समिती घेईल : विभागीय आयुक्‍त

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:20PMपंढरपूर : प्रतिनिधी

पालखी तळासाठी केल्या जाणार्‍या भूसंपादनास नुकसानभरपाई देण्याची मागणी आलेली नाही. तसेच हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीपुढे मांडला जाईल आणि त्यांच्या मान्यतेनंतर भूसंपादनास मोबदला देण्याचा निर्णय शिखर समिती घेईल, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्‍त दीपक म्हसेकर यांनी केले. पंढरपूर येथे विविध विकास कामांच्या पाहणीसाठी आल्यानंतर म्हसेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते. 

तत्पूर्वी, सकाळी विभागीय आयुुक्‍तांनी पंढरपूर शहरात फिरून विविध शासकीय योजनांतील विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावरील विकासकामांची पाहणी करून आयुुक्‍तांनी स्थानिक नागरिकांशी सवांद साधला आणि त्यांच्या सूचना मागवून घेतल्या. 

या पत्रकार परिषदेत दीपक म्हसेकर म्हणाले की, पालखी तळासाठी ज्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यांच्या नुकसानभरपाईचा धोरणात्मक निर्णय अद्याप झालेला नाही. खासगी जमिनीवर सध्या तरी विकासकामे प्रस्तावित नाहीत. वाखरी येथे जे भूसंपादन प्रस्तावित आहे तो विषय मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीपुढे मांडला जाईल. त्या समितीमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. 

पालखी मार्गावर सध्या जी विकासकामे प्रस्तावित केली आहेत, त्यांच्या उपयोगीतेचा फेरविचार केला जाणार आहे. स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन वर्षभर संबंधित गावांना ज्यांचा उपयोग होईल, त्या कामांना प्राधान्य दिले जाईल. ज्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील सुविधा गरजेच्या आहेत, त्या ठिकाणी त्या सुविधा दिल्या जातील. स्थानिक लोकांना विश्‍वास घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करून योग्य त्या पर्यार्यांचा विचार केला जाईल, अशीही ग्वाही म्हसेकर यांनी दिली. 

पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पालखी सोहळे येत असतात या मार्गावरील विकास कामांमध्ये समन्वय रहावा म्हणून अतिरिक्‍त जिल्हाधिकारी किंवा उप जिल्हाधिकारी दर्जाचा एखादा अधिकारी नियुक्‍तीचा प्रस्ताव आहे. पंढरपूर शहरातील सर्व कामे दर्जेदार होतील आणि भाविकांना त्यांचा चांगला उपयोग होईल यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या आगामी यात्रेपूर्वी करावयाच्या सर्व कामांना प्राधान्य दिले असून कालमर्यादा घालून विकास कामे पूर्ण केली जातील असेही विभागीय आयुक्‍तांनी यावेळी सांगितले.