Thu, Jul 18, 2019 15:13होमपेज › Solapur › मृत नद्या पुनर्जीवित न केल्यास मानवावर संकट

मृत नद्या पुनर्जीवित न केल्यास मानवावर संकट

Published On: Jul 24 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 7:24PMपंढरपूर : प्रतिनिधी 

दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या मृत नद्यांना पुनर्जीवित केले नाही तर भविष्यात मानव जातीला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. प्रदूषित पर्यावरणसारखी समस्या  प्रखरतेने जाणवेल. त्यासाठी प्रत्येक वारकर्‍याने घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांच्या नावे दोन दोन झाडे लावावीत, अशी विनंती बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे वंशज श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड यांनी वारकर्‍यांना केली.    

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्यावतीने पवित्र चंद्रभागेची आरती आषाढी शुद्ध एकादशीच्या पूर्वसंध्येला भक्‍त पुंडलिक घाटावर श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड यांच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, ऊर्मिला विश्‍वनाथ कराड, उषा विश्‍वनाथ कराड, ज्योती कराड-ढाकणे, प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, मुकुंद चाटे, अजित गोसावी, सरकार निंबाळकर, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, दत्तात्रय बडवे हे उपस्थित होते. 

श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड म्हणाले, वारकर्‍यांनो दोन्ही हातांनी झाडे लावा तसेच पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात करा. दिवसेंदिवस कमी होत जाणारी पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करावी लागेल. त्यासाठी सरकारद्वारा चालविण्यात येणार्‍या पाणतळ योजना, सिंचन योजना, शेततळे यासारख्या योजना अमलात आणा. प्रा. डॉ. कराड म्हणाले, ‘नमामि गंगे’सारखा उपक्रम सुरू करून सरकारने अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांना पुनर्जीवन  मिळेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. डॉ.पठाण  यांनीही मनोगत  व्यक्‍त केले.  शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.