Fri, Nov 16, 2018 19:23



होमपेज › Solapur › नीरा व भीमा नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

नीरा व भीमा नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

Published On: Aug 17 2018 7:57AM | Last Updated: Aug 17 2018 7:57AM



बोंडले (सोलापूर) : विजयकुमार देशमुख

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाचे असलेल्या नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. नीरा खोर्‍यातील भाटघर व नीरा-देवधर या धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वीर धरणात येत आहे. या विसर्गामुळे वीर धरणामधून काल सायंकाळी १३ हजार ९११ क्युसेस विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला होता. परंतु पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे रात्री १ वाजता पुन्हा यात वाढ करण्यात आलेली असून हा विसर्ग २३ हजार १८५ क्युसेस एवढा करण्यात आला आहे.

नीरा-देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत आहे. धरणात येणार्‍या विसर्गाचा विचार करून वीर धरणामधून नीरा नदी पत्रात सोडण्यात येणार्‍या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अभियंता, वीर धरण यांच्याकडून तहसिलदार खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, पुरंदर, बारामती व इंदापूर यांना संबंधित कार्यक्षेत्रातील नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे, उपविभागीय अभियंता, अजित जमदाडे यांनी दै.पुढारी ला दिली.

यावर्षीच्या हंगामात वीर धरण दुसर्‍यांदा पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. वीर धरणात या वर्षी दि.२२ जुलै रोजी ९७.१५ टक्के पाणी साठा झालेला होता. परंतु पावसाने उघडीप घेतलेली होती व वीर धरणामधून नीरा उजवा व डावा कालव्यास खरीप हंगामातील आवर्तन सुरू असल्यामुळे धरणाची पाणी पातळी ९७.१५% वरून ८४.८७% वरती आलेली होती परंतु मागील चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरण पुन्हा भरलेले आहे.

नीरा खोर्‍यातील धरणे भरलेली असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्हयातील बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

दरम्यान नीरा नदीत विसर्ग सुरू असल्यामुळे भीमा नदीकाठच्या माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे तसेच सोलापूर शहराचा पाणी प्रश्नही मिटण्याची शक्यता आहे.

भाटघर, नीरा-देवधर व वीर धरणाची आकडेवारी खालील प्रमाणे

भाटघर
पाणी पातळी ६२३.२८ मी.,
एकुण साठा ६७२.६५ द.ल.घ.मी.,
उपयुक्त साठा ६६५.५७ द.ल.घ.मी.,
टक्केवारी  १००%,
उपयुक्त साठा २३.५० टीएमसी.

निरा देवधर
पाणी पातळी ६६७.१० मी.,
एकुण साठा ३३७.३८ द.ल.घ.मी.,
उपयुक्त साठा ३३२.१२ द.ल.घ.मी.,
टक्केवारी  १००%,
उपयुक्त साठा ११.७३ टीएमसी.

वीर धरण
पाणी पातळी ५७९.८५ मी.,
एकुण साठा २७८.४९ द.ल.घ.मी.,
उपयुक्त साठा २६६.४० द.ल.घ.मी.,
टक्केवारी १००%,
उपयुक्त साठा ९.४१ टीएमसी.