Mon, Jun 17, 2019 02:29होमपेज › Solapur › पंढरपूर शहराला उद्यापासून दररोज पाणीपुरवठा

पंढरपूर शहराला उद्यापासून दररोज पाणीपुरवठा

Published On: Jun 03 2018 11:03PM | Last Updated: Jun 03 2018 10:27PMपंढरपूर : प्रतिनिधी

 उजनीतून सोडण्यात आलेले पाणी पंढरपूर तालुक्यात दाखल झाले असून पटवर्धन कुरोली बंधार्‍यातून रविवारी हे पाणी गुरसाळे बंधार्‍यात पोहचले आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेला पुरेसा पाणी उपलब्ध झाल्याने मंगळवारपासून शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बंधार्‍यात पाणी दाखल झाल्याने शिरभावी पाणीपुरवठा योजना व कासेगाव पाणी पुरवठा योजनांचाही पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गुरसाळे बंधार्‍यातील पाणी साठा कमी झाल्याने गेल्या महिनाभरापासून नगरपालिकेकडून शहरवासीयांना एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. अशीच परिस्थिती या बंधार्‍यावर अवलंबून असलेल्या योजनांची झाली आहे. येथून शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जी सांगोला तालुक्याला पाणी पुरवठा करते. तर दुसरी कासेगाव पाणी पुरवठा योजना. या कासेगाव योजनेतून  10 गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेतूनही पाण्याअभावी एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु उजनीतून भीमा नदीद्वारे सोलापूर शहराकरिता पिण्यासाठी सोडण्यात आलेली पाणी रविवारी पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली बंधार्‍यात दाखल झाले आहे. येथून हे पाणी पुढे सरकत गुरसाळे बंधार्‍यात आज सोमवारी दाखल होत आहे.

उजनीतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी असल्याने दि. 29 मे रोजी सोडलेले पाणी  पाचव्या दिवशी पंढरपूर तालुक्यात दाखल झाले आहे. पटवर्धन कुरोली बंधार्‍यातून हे पाणी पुढे सरकले असून आज गुरसाळे बंधार्‍यात दाखल होत आहे. गुरसाळे बंधार्‍यातून पुढे हे पाणी दगडी पुलाजवळील चंद्रभागा बंधार्‍यात दाखल होईल. तर बुधवारी सायंकाळी अथवा गुरुवारी सकाळी हे पाणी विष्णुपद बंधार्‍यात दाखल होणार आहे. या बंधार्‍यात पाणी दाखल झाल्यास अधिकमासानिमित्त चंद्रभागेत स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांची सोय होणार आहे. चंद्रभागा नदीपात्रात वाहते पाणी नसल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. पाण्यात शेवाळ, निर्माल्य, कचरा याचा भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु उजनीतून सोडण्यात आलेले पाणी भाविकांच्या स्नानाचा व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.