Tue, Jun 18, 2019 20:45होमपेज › Solapur › लक्ष्मी दहिवडी प्रस्थापितांविरोधात युवकांमध्ये नाराजीचा सूर

लक्ष्मी दहिवडी प्रस्थापितांविरोधात युवकांमध्ये नाराजीचा सूर

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 10:50PM

बुकमार्क करा
लक्ष्मी दहिवडी : प्रमोद बनसोडे

मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात लक्ष्मी दहिवडी बाले किल्ला असून या गावात कोणत्याच पक्षाचा वजनदार स्थानिक नेता नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लक्ष्मी दहिवडीतील ग्रामपंचायत निवडणुक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्यामुळे या निवडणुकी अगोदर युवा पिढीला नेतृत्व करण्याची संधी असुन सरपंच पदाचा उमेदवार युवकांनी अद्याप न जाहीर केल्यामुळे राजकीय मंडळीतुन चर्चेला उधाण आले आहे.

लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी अगदी जवळ आली असली तरी अजुन राजकीय आघाडीवर शांतता दिसून येत आहे. येणा-या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद हे जनतेतुन निवडले जाणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांतून कोण-कोणत्या पार्टीचा उमेदवार असेल या बाबत चर्चेला उधान आले आहे. लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायतीवर विद्यमान आमदार भारत भालके यांची सत्ता असून विधान परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाला मागील वेळी सरपंच पदासाठी यश आले होते. मात्र राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर भालके गटाने ग्रामपंचायतवर  झेंडा फडकविला. परंतु भालके गटातील काही सदस्य सद्या अवताडे गटात सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. सद्या लक्ष्मी दहिवडी गावात आवताडे गट भक्कम असला तरी या गटातील कार्यकर्त्यांमध्ये फुट पडणार असल्याची चर्चा होत आहे. अवताडे गट कार्यकर्त्यांनी भक्कम ठेवला तर येणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत अवताडे गटाला  संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार भारत भालके यांचा ही गट मोठा असून यांच्या कार्यकर्त्यांमधुन अंतर्गत कासवगतीने मोर्चेबांधणी चालू असली तरी कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. भालके यांनी मनात आणले तर येणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत मिळवून सरपंच भालके गटाचा होईल. परंतु कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दुर करून नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली तर भालके गटही सत्ता ताब्यात राखण्यात यशस्वी होऊ शकतो.  आज तरी ग्रामपंचायत  निवडणूक  या दोन गटातच होईल असा प्राथमिक अंदाज असुन इतर पक्षातील नेते मंडळी गावतील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या भेटी-गाठी घेऊन चाचपणी करीत आहेत. लक्ष्मी दहिवडीतील राजकीय वातावरण सर्वच बाजुने गोंधळलेल्या अवस्थेत आहे. गावात अनेक समस्या असल्यामुळे जनता बहुतांश लोकप्रतिनिधीवर नाराज असल्याचे दिसते. या संधीचा युवा पिढीने फायदा घेतला तर ग्रामपंचायत निवडणूक ही लोकप्रतिनिधीना जाचक ठरेल आणि अटी-तटीची लढत होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला न स्विकारता गाव पातळीवर सर्व समाजात संपर्क असलेला, निर्व्यसनी, गावाबद्दल तळमळ असणारा, पदवीधर आणि या क्षेत्रातील माहिती असणार्‍या युवकाला सरपंच करण्यासाठी युवक वर्गात तयारी सुरू आहे. युवा पिढीने अद्याप हे नाव गुलदस्त्यात ठेवले असुन ऐनवेळी सरपंचपदाचा अर्ज दाखल करण्याची तयारी त्यांची असल्याचे युवकांतुन बोलले जात आहे. 

ग्रामपंचायत निवडणुक जवळ आली असुन काही का होईना पण सरपंच आपल्या गटाचा करण्यासाठी आणि एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी भेटी-गाठी सुरू असून निवडणुकीची गावात सध्या चर्चा चांगलीच रंगली आहे.