Mon, Mar 25, 2019 03:10
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्ला

दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्ला

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:46PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

अहमदनगर-टेंभुर्णी महामार्गावर शेलगाव-भाळवणी शिवारात ट्रक अडवून लुटण्याचा प्रयत्न करीत असताना पाचपैकी एका अल्पवयीन दरोडेखोराला करमाळा पोलिसांनी पकडले. यावेळी एका दरोडेखोराने चाकूहल्ला करून पोलिसाला जखमी करण्याचा प्रयत्न केला. 

याबाबत महेश संजय माने या पोलिसाने करमाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन दरोडेखोरास पाठलाग करून पकडले असून त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (एम एच 45/ यू-5922) ही जप्त केली आहे. यावेळी इराणसाहेब आपरिशा भोसले, धर्मेंद्र ऊर्फ गंड्या आपरिशा भोसले, अभिजित आपरिशा भोसले, येडंग्या ऊर्फ छकुल्या आपरिशा भोसले (सर्व रा. शेलगाव वांगी, ता. करमाळा) असे पळून गेलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हा प्रकार एक मार्च गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आदिनाथ कारखान्यासमोरील हॉटेल साईसमोर झाला.

पाच संशयित दरोडेखोर हे ट्रक अडवून लुटण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी करमाळा पोलिसांचे गस्तीपथक या ठिकाणाहून जात असताना हा लुटीचा प्रयत्न करतानाचा प्रकार दिसल्याने महेश माने, रोहित बागल व जालिंदर गोरे या पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अल्पवयीन दरोडेखोराचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत या संशयिताने चाकूने     
वार करून पोलिस कर्मचार्‍याला जखमी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र कुशलतेने पोलिसांनी त्याला पकडले. मात्र इतर चौघे त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या अल्पवयीन गुन्हेगाराला सोलापूर येथील बाल गुन्हेगार न्यायालयात उभे करण्यात आले असून करमाळा पोलिसांत दरोड्याचा प्रयत्न करण्याचा पाच संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे हे करीत आहेत.