होमपेज › Solapur › कॉपीराईट करताय, थांबा! डीसीयू वॉच ठेवतोय

देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट मुंबईत  

Published On: Feb 02 2018 11:46PM | Last Updated: Feb 02 2018 11:46PMसोलापूर : श्रीकांत साबळे

दरवर्षी कॉपीराईटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा चालणार्‍या काळ्या धंद्याला चाप लावण्यासाठी देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट अर्थात डीसीयू महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहे. या युनिटच्या माध्यमातून कॉपीराईट करणार्‍यांवर वॉच ठेवला जात असून यात दोषी आढळणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे कॉपीराईटचा व्यवसाय करत असाल तर वेळीच सावधान व्हा, अन्यथा तुमच्या हातात बेड्या पडल्याच म्हणून समजा.

फिल्म इंडस्ट्रीमुळे कॉपीराईट हा आपल्याकडे परवलीचा  शब्द बनला आहे. परंतु चित्रपट क्षेत्राप्रमाणेच संशोधन, उद्योग, डिजिटल कंपन्या या क्षेत्रालाही दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या संख्येत आर्थिक फटका बसत असतो. शिवाय यातून चालणारा काळा धंदा यामुळेही हे क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. या क्षेत्रावर नियंत्रण  ठेवण्यासाठी कायदा अस्तित्वात आहे, परंतु त्याचा शोध घेणारी यंत्रणा मात्र आपल्याकडे कार्यान्वित नव्हती. त्यामुळे हा काळा धंदा वरचेवर सर्वच क्षेत्रांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून आल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या देशातील पहिल्या सायबर सेलने कॉपीराईटच्या गोरखधंद्याला आळा घालण्यासाठी लंडन मेट्रोपॉलिटन पोलीसच्या धर्तीवर महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट कार्यान्वित केेले आहे. सायबर सेलच्या मुख्यालयात हा सेल कार्यान्वित करण्यात आला असून या युनिटअंतर्गत संशयास्पद संकेतस्थळांवर वॉच ठेवण्यात येत आहे. आजअखेर या युनिटकडून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणार्‍या शंभरहून अधिक संकेतस्थळांना कारवाईबाबतच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याउपरही या संकेतस्थळांवर अशाप्रकारे कॉपीराईटची प्रक्रिया सुरू राहिल्यास संंबंधित अ‍ॅडमिनविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कार्यालय झाले कार्यान्वित

कॉपीराईटच्या काळ्या धंद्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरअंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेले डिजिटल क्राईम युनिट हे देशातील पहिले युनिट आहे. या युनिटअंतर्गत वेगवेगळ्या संकेतस्थळांचे निरीक्षण करून त्यावर चालणार्‍या अवैध बाबींवर वॉच ठेवला जातो. त्यानंतर संबंधित अ‍ॅड मिनला नोटीस देऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. हे युनिट मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. 

संशोधन, चित्रपट, डिजिटल हाऊस याठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉपीराईटचे प्रकार घडतात. गैरप्रकारांना आळा घालण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात आम्हाला यशही येत आहे.  
    - बाळसिंग राजपूत, एसपी, महाराष्ट्र सायबर