Wed, Feb 20, 2019 02:26होमपेज › Solapur › पंढरपुरात बेदाण्याला ‘अच्छे दिन’

पंढरपुरात बेदाण्याला ‘अच्छे दिन’

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:31PMपंढरपूर :  प्रतिनिधी 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा लिलावात प्रथमच बेदाण्याला 250 रुपयांहून अधिकचा उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकर्‍यांना  काहीअंशी दिलासा मिळाला आहे. आणखी काही दिवस बेदाण्याला वाढीव दर मिळण्याची शक्यता व्यापार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बेदाण्याला ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र दिसून येते.

पंढरपूर तालुक्यातून भीमा नदी वाहात असल्याने त्याचबरोबर उजनी डावा व उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसशेती आहे. मात्र  दिवसेंदिवस एकाच प्रकारची शेती न करता शेतकर्‍यांनी ऊसाबरोबर फळ पिकांची शेती करण्याकडेही लक्ष दिले आहे. त्यामुळे तालुक्यात डाळिंब, बोर, द्राक्ष शेती बहरत आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरु आहे. द्राक्षाला बाजारात 40 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी द्राक्षे विक्रीकरिता बाजारात घेऊन येत आहेत. परंतु बेदाण्याला गेल्या चार ते पाच वर्षांतील उच्चांकी दर मिळू लागला आहे. त्यामुळे अधिकतर द्राक्षे उत्पादक शेतकरी बेदाणानिर्मिती करण्यावर भर देत आहेत. चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावात चांगला दर मिळत आहे. 160 रुपयांपासून ते 270 रुपये उच्चांकी दर मिळत आहे. बाजारात बेदाण्याची झालेली कमी आवक व मागणी वाढत असल्याने बेदाण्याला दरही चांगला मिळत आहे. कासेगाव, अनवली, करकंब, वाडीकुरोली, खर्डी, कोर्टी, तनाळी, शेटफळ, आढीव आदी भागांत मोठ्या प्रमाणात द्राक्षांची शेती आहे. मागील महिन्याभरापूर्वी 100 ते 200 रुपये प्रति किलो दर होते. मात्र सध्या खाली 160, तर वर 270 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी  शेडवर तयार केलेला बेदाणा विक्रीकरिता बाजारात आणत आहेत. लांबसडक बेदाण्याला सर्वाधिक दर मिळत आहे. जाधववाडी येथील विलास जाधव यांच्या बेदाण्याला 271 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.

पंढरपूरच्या बेदाण्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील व्यापार्‍यांकडून चांगली मागणी होत आहे.