होमपेज › Solapur › माजी नगरसेवक डोंबे यांना चोर समजून मारहाण

माजी नगरसेवक डोंबे यांना चोर समजून मारहाण

Published On: Jun 29 2018 9:09AM | Last Updated: Jun 29 2018 9:08AMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूरचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका श्वेता डोंबे यांचे सासरे नंदकुमार बाळोबा डोंबे यांच्यासह तालुक्यातील अन्य दोन जणांना नंदूरबार जिल्ह्यात जमावाने मारहाण केली. मुलं चोरणारे चोर असल्याचे समजून ही मारहाण झाल्याचे समजते. मारहाण करणाऱ्या जमावाने डोंबे यांची इनोव्हा कारही पेटवून दिली.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात म्हसावद इथे माजी नगरसेवक डोंबे आणि त्यांचे 2 सहकारी  मजुराच्या शोधात फिरत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला.  डोंबे व त्यांच्या साथीदारांना घेरुन  बेदम मारहाण केली. या मारहाणीत नंदकुमार बाळोबा डोंबे, रामा विठ्ठल शिंदे (भटुंबरे, ता. पंढरपूर ) , सचिन गुरुलिंग कवडे (पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर ) हे तिघे गंभीर जखमी झालेत.

पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले असता हा जमाव  पोलीस ठाण्यात पोहोचला.  या जमावाने तिघांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी करीत गोंधळ घातला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना जादा बंदोबस्त  मागवावा  लागला. तसेच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. डोंबे आणि त्यांच्या दोन्ही सहकार्यांना पोलिसांनी नंदूरबारच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डोंबे आणि त्यांच्या साथीदारांची प्रकृती  सध्या उत्तम असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण २०० जणांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल केले आहेत.