Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Solapur › सोलापूर : लाचखोर अधीक्षकाच्या घरात कोट्यवधीचे घबाड

सोलापूर : लाचखोर अधीक्षकाच्या घरात कोट्यवधीचे घबाड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सुरक्षा रक्‍कम परत देण्यासाठी 80 हजार  रुपयांची  लाच घेणार्‍या जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यासह दोघांना विशेष न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी 31 मार्चपर्यंत  पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या पथकाने  अधीक्षक अभियंता कांबळे याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून कोरे स्टॅम्प पेपर, सोन्याचे दागिने, लाखोंची रोकड, फ्लॅटची कागदपत्रे, शेतीची कागदपत्रे  असे कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाले आहे.

जलसंपदा विभागाच्या भीमा कालवा मंडळ सोलापूरचे अधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे (वय 53, रा. कोनार्कनगर, विजापूर रोड) आणि चालक कैलास सोमा अवचारे (वय 30, रा. सावळेश्‍वर, ता. मोहोळ) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अरुण देवकर यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जलसंपदा विभागाच्या भीमा कालवा मंडळाच्या एकरूख उपसासिंचन योजनेच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराची सुरक्षा रक्‍कम परत करण्यासाठीचे पत्र कार्यकारी अभियंत्यांना देण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अधीक्षक अभियंता कांबळे यांच्या घरी सापळा लावून लाचेची रक्‍कम स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत लाचेची रक्‍कम घराबाहेर फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा चालक कैलास अवचारे यासदेखील अटक करून दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवारी दुपारी कांबळे व अवचारे या दोघांना विशेष न्यायाधीश हेजीब यांच्यासमोर हजर करण्यात आले असता दोघांनाही 31 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. शीतल डोके यांनी, तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले. 

Tags : solapur, solapur news, corrupt superintend engineer, police custody, 31 march,seize property, irrigation department


  •