होमपेज › Solapur › अट्टल गुन्हेगार सुनील अकोले येरवड्यात स्थानबध्द

अट्टल गुन्हेगार सुनील अकोले येरवड्यात स्थानबध्द

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 10:52PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जेलरोड व एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार सुनील लक्ष्मीकांत अकोले (वय 25, न्यू सुनीलनगर) यास पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी एमपीडीए कायद्यान्वये येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आयुक्‍त तांबडे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून एमपीडीएअंतर्गत केलेली ही 7 वी कारवाई आहे, तर चालू वर्षातील पहिलीच आहे. 

सुनील अकोले हा लोकांना शस्त्राने धमकावणे, मारहाण करून बळजबरीने लुटणे, लोकांच्या मनात दहशत निर्माण करून किरकोळ कारणांवरून लोकांना शस्त्रानिशी मारहाण करणे अशा गुन्हेगारी कारवाया करतो. अकोले याच्याविरुध्द जेलरोड व एमआयडीसी पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी अकोले याच्यावर 2016 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आले होती. नोव्हेंबर 2017 मध्ये अकोले व त्याच्या साथीदारांनी एकाचे अपहरण करुन त्याच्याकडील सोन्याचे दागिने लुटले होते. याबाबत पोलिसांनी 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 112 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे-वालावलर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक गुरुनाथ माढेकर यांनी केली.