होमपेज › Solapur › सराईत गुन्हेगारास अटक; 7 घरफोड्या उघडकीस

सराईत गुन्हेगारास अटक; 7 घरफोड्या उघडकीस

Published On: Mar 24 2018 1:55AM | Last Updated: Mar 23 2018 10:45PMसोलापूर : प्रतिनिधी

शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक करुन त्याच्याकडून 7 घरफोड्या उघडकीस आणल्या. या गुन्हेगाराकडून 7 घरफोड्यांमधील 63 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रल्हाद    भोजप्पा   चव्हाण (वय 47, रा. तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या गुन्हेगाराकडून  फौजदार  चावडी पोलिस ठाण्याच्या  हद्दीतील 5 आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्यातील 2 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार प्रल्हाद चव्हाण हा तुळजापूर  रोडवरील हिप्परगा क्रॉस रोडवर येणार असल्याची माहिती  शहर  गुन्हे  शाखेच्या  पोलिसांना मिळाल्याने  पोलिसांनी चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. 

त्यावेळी चव्हाण याने आपल्या 5 साथीदारांच्या मदतीने गेल्या 5-6 वर्षांपूर्वी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात 5 ठिकाणी व जोडभावी पेठ पोलिस ठाण्यातील 2 ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबूल करून  ज्याठिकाणी घरफोडी केली ती ठिकाणे पोलिस पथकाला दाखवून दिली. 

या विविध ठिकाणांहून चोरलेल्या दोन डिवॉल्ट कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या ग्राइंटर मशीन, निळ्या-हिरव्या-पिवळ्या रंगाच्या 3 ड्रील मशीन, हिरव्या रंगाचे प्लायवुड कटर मशीन, 20 किलो तांब्याची तार, 5 पितळी डबे, रोख रक्‍कम व 6 घरगुती वापराची गॅस सिलेंडर असा 63 हजार 100 रुपयांचा ऐवज चव्हाण याच्याकडून  पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, हवालदार संजय बायस, दगडू राठोड, सुभाष पवार, राकेश पाटील, जयसिंग भोई, मंगेश भुसारे, संतोष फुटाणे, पोलिस शिपाई वसंत माने यांनी केली.